म. टा. प्रतिनिधी, नागपूरः यंदा मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. पारा आतापासूनच चाळीशीजवळ पोहोचू लागला आहे. शुक्रवारी चंद्रपुरात राज्यातील सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोल्यात ३९.१ आणि ब्रह्मपुरीत ३८.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी पहिली तीन शहरे ही विदर्भातीलच होती.

फेब्रुवारी महिन्यात आलेली थंडीची लाट आणि त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस, यामुळे शहरातील वातावरण बदलले होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांत शहरातील कमाल आणि किमान या दोन्ही तापमानांत वाढ झाली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच हळूहळू उन्हाळ्याचे वेध लागत आहेत. शुक्रवारी शहरातसुद्धा ३७.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. याखेरीज शुक्रवारी शहरात १७.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे आता हळूहळू दिवसाच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे.

त्यामुळे सिग्नल दरम्यान, विविध चौकांमध्ये सावली शोधणारे दुचाकीस्वार दिसू लागले आहेत. सहसा मार्च महिन्याच्या सुरुवातीला इतकी उष्णता नसते. मात्र, यंदा विदर्भातील तपमान मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापू लागला आहे. त्यामुळे एप्रिल, मे मध्ये पारा कुठवर पोहोचणार, असा प्रश्न नागपूरकरांना पडू लागला आहे. पुढील चार दिवस वातावरण असेच कोरडे राहणार असून किमान तापमानही ३७ ते ३८ अंशांच्या आसपासच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरे
चंद्रपूर : ३९.८
अकोला : ३९.१
ब्रह्मपुरी : ३८.८

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here