काही वर्षांपूर्वी गाजलेल्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित आगामी वेबमालिकेला या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या याच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. ‘: द क्युरीअस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ या वेबमालिकेची निर्मिती करण्याआधी परवानगी घेतली नसल्याचा दावा करत तेलगी कुटुंबीयांनी मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता केस’ या वेबमालिकेला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पुढचा भाग तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर असेल, असे मालिकेच्या निर्मात्यांकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार टीझरदेखील प्रदर्शित करण्यात आला. तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. पण मालिकेची निर्मिती करण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असा दावा तेलगी कुटुंबीयांनी केला आहे. तसेच वेबमालिकेचा टीझर कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वत:हून निर्मात्यांशी संपर्क साधला, तरीही निर्मात्यांकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे मालिकेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कुटुंबियांनी दिला आहे. या संदर्भात निर्मात्यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
सिनेनिर्मात्याचाही मालिकेवर आक्षेप
दुसरीकडे, दोन वर्षांपूर्वी सिनेनिर्माते सुनील मंत्री यांनी तेलगी याच्यावर चित्रपट बनवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांची परवानगी घेतली आहे. तसेच कुटुंबीयांशी करारदेखील केला आहे. हा करार इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी करण्यात आला आहे. म्हणजेच तेलगी याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट, मालिका, वेब मालिका किंवा रेडिओ कार्यक्रम बनवण्याचा अधिकार सिनेनर्माते सुनील मंत्री यांना असेल, असे करारात नमूद करण्यात आले आहे. ‘आम्ही दोन वर्षांपूर्वी तेलगी कुटुंबीयांची रितसर परवानगी घेतलेली आहे, करारसुद्धा केला आहे. त्यानुसार तेलगी याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट किंवा वेब मालिकेची निर्मिती करणार आहोत. पण, ‘स्कॅम २००३’च्या निर्मात्यांनी तेलगी कुटुंबीय किंवा आमची परवानगी न घेता मालिकेची निर्मिती केली आहे. याला आमचा आक्षेप आहे’, अशी माहिती सिनेनिर्माते सुनील मंत्री यांनी दिली.
कायदेशीर कारवाईचा इशारा
‘आम्हा कुटुंबियांची परवानगी घेतलेली नाही, ही बाब आम्ही मालिकेच्या निर्मात्यांच्या लक्षात आणून दिली. तरीही त्यांच्याकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. आता कायदेशीर कारवाईशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवाय, मालिकेच्या टीझरमध्ये चुकीची आकडेवारी दाखवण्यात येत आहे. तसेच तेलगीवर आधारित इलेक्ट्रॉनिक माध्यमात कोणतीही कलाकृती बनवण्याचा हक्क सिनेनिर्माते सुनील मंत्री यांना देण्यात आला आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांची परवानगीही घेतलेली नाही, असे तेलगी याचे कुटुंबीय इरफान तेलीकटी यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times