म. टा. प्रतिनिधी, : करोनाच्या काळात शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा थाटामाटात करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. प्रतिबंधक उपाययजोना करण्याची जबाबदारी महापालिकेचीही आहे. असे असूनही नगरमध्ये () महापालिकेच्या एका महत्वाच्या पदाधिकऱ्याच्या घरी मुलीचा विवाह समारंभ थाटामाटात आणि गर्दी जमवून पार पडला. याबद्दल पोलिसांनी आयोजकांना दंड केला खरा, पण त्याची पावती एका कंत्राटदाराच्या नावे फाडण्यात आली आहे. ()

राज्यातील काही जिल्ह्यांप्रमाणे नगरमध्येही करोनाच्या नव्या रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा निर्बंध कडक केले आहेत. यामध्ये लग्न समारंभावर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: काही मंगल कार्यालयांना भेटी देऊन संबंधितांना दंड केला. त्यामुळे आता पोलिसही सतर्क झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सावेडी भागात असा एक लग्न सोहळा थाटामाटात आणि मोठी गर्दी जमवून सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. पोलिस पथक तेथे गेले. तर महापालिकेच्या पदाधिकाऱ्याच्या मुलीचे लग्न असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाईची भूमिका घेतली. पोलीस ऐकायला तयार नाहीत, हे कळाल्यावर आयोजक दंडाची पावती घ्यायला तयार झाले. त्यानुसार करोना प्रतिबंधक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. संबंधितांनी ही पावती शुभम राजू वाकळे (रा. सावेडी गाव) या नावाने घेतली आहे. वाकळे यांनी आपल्या घरी विना परवाना लग्न समारंभ आयोजित केला. त्यासाठी पन्नासहून अधिक माणसे जमविली आणि विना मास्क आढळून आले, असे कारण पावतीवर नमूद केले आहे. ही घटना ५ मार्चला सायंकाळी घडली. पोलिसांनी पावती सहा मार्चला केल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या महितीनुसार पावतीवर नाव असलेल्या वाकळे यांच्या स्वत:च्या घरी कोणताही लग्न समारंभ नव्हता. तर पदाधिकाऱ्याच्या घरी झालेल्या नियमभंगाबद्दल त्यांनी स्वत:च्या नावाने दंड भरल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे या विवाह समारंभास लोकप्रतिनिधी, पक्षांचे नेते, कार्यकर्ते, अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक यांनीही हजेरी लावली होती. करोनासंबंधीचे सर्व नियम पाळून विवाह होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र सर्व नियमांचा फज्जा उडाला असल्यानेच पोलिसांनी दंड केल्याचे सांगण्यात आले. कारवाईची नागरिकांत चर्चा होऊ नये, यासाठी पावती दुसऱ्याच्या नावाने फाडल्याची चर्चा आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here