अमरावतीः जिल्ह्यातील खरिपाचे मुख्य पिक असलेल्या सोयाबीनला सध्या बाजारात विक्रमी भाव मिळत आहे. यंदा जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकले नाही, काही ठिकाणी पिकलं मात्र उत्पादनात घट झाली. अनेकांचे सोयाबीन ओले झाले होते. त्यामुळे आता बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन विक्रीसाठी राहीले आहे. दरम्यान, शनिवारी (दि. ६) बाजारात सोयाबीनला विक्रमी प्रतिक्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला आहे.

यंदा खरीप हंगामातील पिकांसाठी पाऊस नुकसानदायक ठरला. यातही सोयाबीन कापणीच्या काळातही जिल्ह्यात अनेक भागात पाऊस कोसळला होता. या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला. अति पावसामुळे काही भागात तर सोयाबीनची कापणीसुद्धा करावी लागली नाही. यातील ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बरे होते त्यांचे सोयाबीन पाण्यात ओले झाले, त्यामुळे सोयाबीन तत्काळ विकल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे पाणी लागलेले सोयाबीन शेतकऱ्यांना २००० ते ३००० प्रतिक्विंटल दरानेच विक्री करावे लागले होते. त्यामुळे आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे आणि त्यावेळी शेतकऱ्यांकडून खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे सोयाबीन विक्रीसाठी उपलब्ध आहे. याच मोजक्या शेतकऱ्यांना व त्यावेळी सोयाबीन खरेदी करुन साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना आता सोयाबीनच्या वाढलेल्या दराचा फायदा मिळत आहे. कारण शनिवारी बाजारात सोयाबीनला यंदाच्या वर्षातील उच्चांकी दर मिळाला आहे.

रब्बी हंगामातील हरभरा सुद्धा आता कापणी करुन शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणला आहे. सध्या बाजारात हरभऱ्याची आवक चांगलीच वाढली आहे. शनिवारी बाजारात तब्बल १० हजार ९७४ पोते विक्रीसाठी आले होते. शनिवारी हरभऱ्यास प्रतिक्विंटल ४ हजार ४०० रुपये ४ हजार ७५० रुपये दर मिळाला आहे. यंदा खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीनच्या उत्पन्नात प्रचंड घट आल्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बीतील गहू आणि हरभरा या पिकांवरच अवलंबून आहे. ज्या भागात सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांना मात्र यावर्षी हरभऱ्याचे पीक समाधानकारक आले आहे. यातच बाजारात तूर्तास भावही समाधानकारक आहे. मात्र तुरीच्या भावात अचावक घसरण झाल्याने शेतकरीवर्ग हवालदील झाला आहे.

बाजारातील दर व आवक

कृषीमाल दर आवक

सोयाबीन- ४९०० ते ५१०० ४७९९

तूर- ६५०० ते ६८५० २३९१

हरभरा – ४४०० ते ४७५० १०९७४

आठवड्यापूर्वी उच्च प्रतीच्या तुरीला बाजारात तब्बल ७ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र, शनिवारी उच्च प्रतीच्या तुरीला बाजारात प्रतिक्विंटल ६ हजार ८५० रुपये दर आहे. याचवेळी तुरीला ६ हजार ५०० रुपयांपासून ६८५० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. शनिवारी तुरीची आवक २ हजार ३९१ पोते होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here