मी फक्त मित्रांसाठीच काम करतो, असा आरोप माझ्यावर विरोधक करतात. मग त्यांना माझं उत्तर आहे, हो मी मित्रांसाठी काम करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मी गरीबीतून पुढे आलो आहे. आणि यामुळे सामान्य माणूस हाच माझा खरा मित्र आहे. मी या मित्रांसाठी काम करत राहणार, असं पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावलं.
करोना संकटाच्या काळात मी गरीब मित्रांसाठीच काम केलं. प्रत्येक गरीबाला रेशन दिलं. गॅस सिलिंडर दिला. इतर देशांमध्ये करोना लसीचं शुल्क घेतलं जात आहे. पण आपण प्रत्येकाला करोनाची लस मोफत देत आहोत. यामुळे गरीब हाच माझा मित्र आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
गरीबाच्या झोपडीत जन्मलेले मूल हाच माझा खरा मित्र आहे. करोनाच्या काळात गरीबांच्या खात्यावर पैसे जमा केले गेला. आता देशातील ३० कोटी जनता माझे मित्र आहेत. आणि म्हणून मी बंगालमधील माझ्या मित्रांसाठी काम करतोय, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना टोला लगावला.
बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्राच्या योजना गरीबांपर्यंत पोहोचू दिल्या नाही. कारण ममता सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. माँ, माटीचीची चर्चा करणाऱ्यांनी बंगाल विकला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये निवडणूक खेला होबे… पण पश्चिम बंगालमध्ये इतके घोटाळे झाले आहेत की आता ममता बॅनर्जींचाच खेळ संपणार आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
काँग्रेस स्थापनेच्या मागे बाह्य शक्तींचा हात होता. पण भाजपची स्थापना करणारे बंगालचे होते. भाजपच्या डीएनएमध्ये बंगाल आहे. भाजपवर बंगालचे कर्ज आहे. म्हणूनच आम्ही पश्चिम बंगालला नव्या उंचीवर भाजप नेईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिला.
‘ममतांची स्कुटी नंदीग्राममध्ये पडणार’
ममतादीदींनी स्कुटी चालवली त्यावेळी त्यांना कुठली इजा होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रार्थना केली. पण त्यांची स्कुटी भवानीपूरच्या दिशेने जाण्याऐवजी नंदीग्रामकडे निघाली आहे. यामुळे आता त्यांची स्कुटी नंदीग्राममध्ये पडणार हे निश्चित आहे. कारण यावेळी जोर से छाप आणि टीएमसी साफचा नारा जोरात आहे, असं टोला पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींना लगावला.
‘ममतादीदी भाच्याच्या मोहात अडकल्या’
पश्चिम बंगालमध्ये यावेळी खरे परिवर्तन होणार आहे. कारण ममतादीदीही काँग्रेससारख्या घराणेशाहीच्या मोहात आहेत. ममतांना जनतेने बंगलाचीदीदी बनवलं. पण ममतादीदी मात्र आपल्या भाच्याचं लालच पूर्ण करत आहे. राज्यात हिंसाचार, बेरोजगारी, अत्याचार, अन्याय यापुढे जनता सहन करणार नाही. पश्चिम बंगालमधील जनतेचा आक्रोश देशात पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसचा क्रूर चेहरा संपूर्ण देशाने बघितला आहे, अस घणाघात पंतप्रधान मोदींनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times