नोएडा: उत्तर प्रदेशातील येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रांकडून महागड्या कार घेऊन त्यात प्रवाशांना लिफ्ट देऊन लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. टोळीप्रमुख आणि अन्य दोघांना महामार्ग पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.

अटक केलेले आरोपी शस्त्रांचा धाक दाखवून कारमधून प्रवास करणाऱ्यांकडून दागिने, रोकड आणि एटीएम लुटायचे. आरोपींनी आतापर्यंत २०० हून अधिक प्रवाशांना लुटल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या टोळीतील इतर सदस्य अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सेक्टर १६८मधून तिघा आरोपींना अटक केली आहे. जावेद उर्फ जाबिर, उलूम उर्फ अन्नी आणि मनोज अशी तिघांची नावे आहेत.

आरोपींकडील कार, ११ हजारांची रोकड, पाच बनावट नंबर प्लेट आणि एक पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. जावेद उर्फ जाबिर हा टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यावर नोएडा-ग्रेटर नोएडा आणि अलीगढमध्ये २८ गुन्हे दाखल आहेत. दोन वेळा तो तुरुंगात गेला आहे. नोव्हेंबरमध्येच तो तुरुंगातून सुटून बाहेर आला आहे. तर मनोजवर १५ आणि अन्नी याच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे कारमध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांकडील दागिने आणि रोकड लुटायचे. एखाद्या प्रवाशाकडे एटीएम मिळाले तर, त्याला केंद्रावर न्यायचे. शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे काढून घ्यायचे. केल्यानंतर त्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी नेऊन सोडून फरार व्हायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लुटीच्या पैशांतून तीन मजली घर

टोळीचा प्रमुख जावेद उर्फ जाबिर याने लुटीच्या पैशांतून तीन मजली आलीशान घर खरेदी केले आहे. ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरात त्याचे हे घर आहे. लुटीच्या पैशांतून तो मालमत्ता खरेदी करायचा. पोलीस त्याच्या इतर मालमत्तांचाही शोध घेत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here