गडचिरोलीः स्ट्रॉबेरी म्हटलं की आता महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही. कारण गडचिरोली जिल्ह्यात नंदनवन शेती संकल्पनेतून प्रायोगिक तत्वावर केलेल्या स्ट्रॉबेरी लागवडीची शेती यशस्वी झाली आहे. मुलचेरा येथे कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या मार्फत विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना अंतर्गत सन २०२०-२१ ते २०२२ या ३ वर्षात मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर, मुलचेरा, कोपरअल्ली, विश्वनाथनगर, कोळसापूर या ५ गावात किमान १०० हेक्टर क्षेत्र केंद्रीत करून नंदनवन शेती संकल्पना राबविण्यात येत आहे.

पुर्वी “पिकेल ते विकेल” या पध्दतीने शेती होत होती परंतू राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांनी ‘विकेल ते पिकेल’ यावर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून मागणी असणारे स्ट्रॉबेरी सारखे पिक प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आले. महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणात तर चिखलदरा येथे थोड्या प्रमाणात स्ट्राँबेरी पिकाची लागवड केली जाते. या पिकाकरीता थंड हवामानाची गरज असते. याउलट पुर्व विदर्भातील चंद्रपुर हे उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होते. याच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेपासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका येतो.

हवामानाची कसोटी असतानाही पहिल्या वर्षात चार शेतक-यांच्या प्रक्षेत्रावर प्रत्येकी ४०० रोपे याप्रमाणे एकूण १६०० रोपांची लागवड करण्यात आली.
लागवडीकरीता महाबळेश्वर येथून रोपे मागविण्यात आली होती. यावर्षी रोपे मिळत नसल्याने व जमीन मशागत वेळेवर न झाल्याने लागवडीस थोडा उशीर झाला होता. परंतू आता या तालुक्यात हे पीक होऊ शकते हा ठाम विश्वास बसल्याने पुढील वर्षीपासून पावसाळ्यातच रोपांची नोंदणी करून ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच याची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

चांगला दर, कमी कालावधी, चांगले उत्पन्न या सर्व बाबींमुळे निसर्ग संपन्न गडचिरोली जिल्ह्यात पर्यटनाला पुरक पीक म्हणून स्ट्राँबेरी हे पीक समोर येऊ शकते व यासाठी कृषी विभाग सर्वोतेपरी प्रयत्न करणार आहे. या जिल्ह्यात हे पिक होऊ शकते याकरीता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला व पूर्वीच्या उपविभागीय कृषी अधिकारी कु. प्रिती हिरळकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यासाठी दाखविलेला विश्वास तर जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब बऱ्हाटे ,उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचा मोलाचा वाटा आहे.

यामध्ये शेतकरी गट निर्मिती व प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षण यांच्या माध्यमातून शेतक-यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम रेनशेल्टरमधील भाजीपाला लागवडीद्वारे पावसाळ्यात सुध्दा चांगल्या दर मिळणा-या विशेषता कोथिंबीर, पालक, मेथी या भाज्यांचे उत्पादन करून चांगला नफा मिळवता येतो हा उद्देश आहे. शेडनेटच्या माध्यमातून बारमाही भाजीपाला लागवडीचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचणार आहे.
सेंद्रिय शेती व एकात्मीक कीड नियंत्रणाकरीता सेंद्रीय निविष्ठा निर्मीतीबद्दल शेतक-यांना प्रशिक्षीत करण्यात येत आहे. याकरीता जैविक युनीटची उभारणी करण्यात आली आहे.

सामुहिक नर्सरीच्या माध्यमातून शेतक-यांना आधुनिक पध्दतीने भाजीपाला रोपे निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देऊन मागणीनुसार स्वस्त दरात भाजीपाला रोपे, हिरवळीचे खत रोपे, सापळा रोपे उपलब्ध करून देण्यात येणार. उत्पादीत झालेल्या दर्जेदार शेतमालाला भाव व बाजारपेठ मिळण्यासाठी “शेतकरी ग्राहक विक्री केंद्र ” तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विक्री व्यवस्था या बाजारभीमुख उपक्रमावर भर देण्यात येणार आहे. मका व अश्वगंधा पीक प्रात्यक्षिक राबविण्यात येणार आहे. तालुक्यात एकीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी मत्स्य व्यवसायकडे वळले तर दुसरीकडे भरपूर प्रमाणावर मक्याचे उत्पादन होत आहे. जिल्ह्यात अद्याप हवा तसा दुग्धव्यवसाय विकसित झालेला नाही यामुळे वर्तमानात दुधाची मागणी पाहता पशुपालनाकडे कल वाढणार आहे. या बाबींचा विचार करून मत्स्य खाद्य, पशुखाद्य व कुक्कुट खाद्य निर्मिती प्रक्रिया उद्योगास चालना देण्यावर भर देण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here