मुंबईः आजच्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री यांनी महिली सक्षमीकरणाच्या दृष्टीने राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना जाहीर केली आहे.

आजच्या महिलादिनी विद्यार्थीनी, गृहिणी, कष्टकरी महिलांसाठी राज्य सरकारनं नव्या योजना जाहीर केल्या आहेत. कोणतंही कुटुंब राज्यात घर विकत घेईल तेव्हा त्याची नोंदणी महिलांच्या नावावर व्हावी व ती खऱ्या अर्थानी गृहस्वामिनी बनावी यासाठी प्रोत्साहन म्हणून १ एप्रिल २०२१पासून गृहखरेदीची नोंदणी महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार आहे.

मुलींचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत केले आहेत. त्यानंतर राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन देणारी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनासाठी दीड हजार सीएनजी व हायब्रिड बस उपलब्ध करुन देण्यात येतील. तसंच, शहरात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणखी तेजस्विनी महिला बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसंच, राज्य राखीव पोलीस दलात राज्यातील पहिलीच स्वतंत्र महिला पोलीसांची तुकडीची घोषणा अजित पवारांनी केली आहे.

करोना काळातील टाळेबंदीचा फटका बसलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या महिलांची नोंदणी व आधार ठरेल अशी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना अजित पवारांनी जाहीर केली आहे. या महिलांच्या सुरक्षेसाठी २५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. जमा होणाऱ्या एकूण निधीतून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना राबवण्यात येतील.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here