मुंबई: भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरलेल्या शिवसेनेनं भाजपवर टीकेचा भडिमार सुरूच ठेवला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं कौतुक करतानाच शिवसेनेनं भाजपला जोरदार टोले हाणले आहेत. ‘भाजप सुकलेल्या तलावात कमळं फुलवीत आहे,’ अशी बोचरी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

वाचा:

केजरीवाल ‘लय भारी’ अशा शीर्षकाखाली असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून दिल्लीतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी देशातले २०० खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले असतानाही एक केजरीवाल सगळ्यांना भारी पडत आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे. दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या ‘फुलोत्पादना’ला आमच्या शुभेच्छा, अशी खोचक टिप्पणीही करण्यात आली आहे.

वाचा: वाचा:

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

>> केजरीवाल यांच्या भूमिका, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात, पण हाती मर्यादित सत्ता असताना, केंद्राने वारंवार अडथळे आणूनही आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा याबाबतीत त्यांच्या सरकारचे काम आदर्श आहे.

>> केजरीवाल सरकारच्या कार्याचा आदर्श घेऊन पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने हे ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवायला हरकत नव्हती, पण केजरीवाल यांनाच खोटे ठरविण्यासाठी सारी यंत्रणा राबवली जात आहे.

>> एखाद्या राज्यात कुणी चांगले काम करीत असेल व ते राज्य आपल्या विचाराचे नसेल तरीही चांगल्याला चांगले म्हणणे व ते चांगले काम पुढे घेऊन जाणे हेच देशाच्या लोकनायकाचे कर्तव्य असते. पण ही मनाची दिलदारी आज उरलीय कुठे?

>> आमचे राज्यकर्ते अमेरिका, फ्रान्स, युरोपादी राष्ट्रांतील एखाद्या व्यवस्थेने प्रभावित होऊन ते ‘मॉडेल’ हिंदुस्थानात राबवतील, त्याचा डांगोरा पिटतील, पण दिल्लीतील सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या याचे कौतुक करताना त्यांच्या पोटात सर्जिकल स्ट्राइकचा गोळा का उठावा तेच कळत नाही.

>> पाच वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी जी वचने दिली ती पूर्ण झाली व त्याबद्दल श्री. मोदी किंवा श्री. शहा यांनी केंद्रीय सरकारतर्फे केजरीवाल यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कारच करून नवा पायंडा पाडायला हवा. पण ते न करता भाजपचे बडे नेते व मंत्री दिल्लीत निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू विरुद्ध मुसलमान असा राजकीय चिखल तुडवीत बसले आहेत.

>> ‘केजरीवाल हे आतंकवादी आहेत’ असादेखील भाजपचा प्रचाराचा मुद्दा आहे. ते आतंकवादी असल्याचे

पुरावे असतील तर

सरकार हात चोळत का बसले आहे? कारवाई करायला हवी.
२०१४ साली दिल्लीच्या ७० टक्के मतदारांनी केजरीवाल यांना म्हणजे आतंकवाद्याला मतदान केले असे भाजपला म्हणायचे आहे काय?

>> पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार सभांचे मुद्दे तरी काय? बाटला हाऊस आणि कलम ३७०. भारतीय जनता पक्षाने देशाच्या पंतप्रधानांना इतके खाली आणू नये. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांना मतदानातून शिक्षा करा. मोदी यांचे म्हणणे दिल्लीच्या मतदारांनी उद्या ऐकले नाही तर लाखो मतदार हे देशद्रोही आहेत असे ठरवून नवे येणारे सरकार ते बरखास्त करणार आहेत काय? एकतर अशा चिखलात देशाच्या पंतप्रधानांनी उतरू नये व उतरलेच आहात तर संयम राखा.

>> केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. दिल्लीचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here