अर्थसंकल्पात एकही नवीन योजना नसून अर्थसंकल्पाने शेतकरी आणि सामान्य लोकांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने डिझेल आणि पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरुन जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.
‘चोराच्या उलट्या बोंबा याच्यापेक्षा वेगळं वर्णन याचं करता येणार नाही. केंद्र सरकारचा दर सातत्याने वाढतोय. १०० रुपये पार केले. ही पूर्णपणे जबाबदारी दिल्लीतील मोदी सरकारची आहे. त्यांनी पेट्रोल डिझेलवरील दर वाढवायचा, त्यावर देश चालवायचा आणि राज्यांनी कर न वाढवता जो आहे, तोच ठेवला. तर राज्यांना त्याचे कर कमी करायला लावायचे, हा पूर्णपणे राज्यांवर अन्याय आहे,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
‘केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, तर राज्यांच्या महसूलामध्येही घट होईल. त्यामुळे केंद्र सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं की, आम्हाला पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून द्या म्हणजे राज्यातील जनतेवरील पेट्रोल-डिझेलचा बोझा कमी होईल,’ असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
सर्वसमावेशक अर्थसंकल्प
‘अर्थसंकल्पात सर्वस्तरावर सर्वांना न्याय देण्याचं काम अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. विशेषतः रस्ते, जलसंपदा आणि पायाभूत सुविधा यामध्ये मोठी गुंतवणूक राज्य सरकारने केलेली दिसते. त्यामुळे करोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला वेग येईल,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times