पुणे: पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी सराईत वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. हौसेपोटी तो दुचाकी चोरून पेट्रोल संपल्यानंतर त्याच ठिकाणी त्या सोडून पसार व्हायचा. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरोधात पुण्यात वाहनचोरीचे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत.

दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर आणि पोलीस निरीक्षक विजय खोमणे (गुन्हे) यांच्या आदेशानुसार, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्याचवेळी पोलीस हवालदार सुधीर घोटकुले आणि पोलीस अंमलदार विष्णू सुतार, शरद राऊत यांच्या पथकाला खबऱ्यांकडून माहिती मिळाली. चोरीची दुचाकी घेऊन एक व्यक्ती पुणे-सातारा रोड परिसरातील पर्वती दर्शन एसटी कॉलनीजवळ उभा असल्याचे खबऱ्याने सांगितले. त्यानंतर लोहार आणि पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. त्याला अटक केली. गणेश उर्फ भुंग्या खैरमोडे (वय ३७, धायरी, ) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीची चौकशी केली असता, त्याच्याकडे चोरीची दुचाकी सापडली. दत्तवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल चौकशी केली असता, त्याने शहरातून विविध ठिकाणांहून चार दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. दत्तवाडी आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे. हौसेपोटी तो दुचाकी चोरायचा आणि पेट्रोल संपल्यानंतर तिथेच ती सोडून द्यायचा, अशी माहिती उघड झाली आहे. त्याच्याकडील चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या सराईत वाहनचोरावर पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे १८ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोहार हे करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here