देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मनसुख हिरन यांच्या पत्नी विमला हिरन यांचा तक्रारीचा अर्ज वाचून दाखवला. ‘२६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वाझे यांच्यासोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर ते १०. ३० वाजता आले. दिवसभर सचिन वाझेंसोबत होतो. असं त्यांनी मला सांगितलं. २७ फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री १०.३० वाजता आले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सचिन वाझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. जबाबाची प्रत घरी आणून ठेवण्यात आली. त्यावर सचिन वाझे यांचे नाव व स्वाक्षरीदेखील आहे,’ असं हिरेन यांच्या पत्नीनं जबाब नोंदवल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच, ३ मार्च रोजी माझे पती दुकान बंद करुन घरी गेले, त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सचिन वाझेंनी मला सांगितलं की तु या प्रकरणात अटक हो मी तुला दोन दिवसांत जामिनावर सोडवतो, असं सचिन वाझेंनी त्यांना सांगितलं असल्याचं हिरन यांच्या पत्नीनं या जबाबात म्हटलं आहे.
‘संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची विनंती आहे,’ असं मनसुख हिरन यांच्या पत्नीनं तक्रारीत नमूद केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्ज वाचून दाखवला आहे.
‘२०१७ चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यामध्ये दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचं नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसरा सचिन हिंदुराव वझे. मनसुख हिरन यांचं शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे याच्याकडे आहे. ४० किमी दूर बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय? काहीच नाही. गावडेच्या ठिकाणापासून ४० किमीवर हिरन यांची बॉडी सापडली. त्यामुळे हे स्पष्ट आहे, यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. इतके पुरावे असताना अटक का होत नाही. त्यामुळं माझी मागणी आहे की तात्काळ सचिन वाझेंना अटक झाली पाहिजे,’ अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
‘आम्हाला संशय आहे की मनसुख हिरन यांची हत्या गाडीतच करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत फेकून देण्यात आला. खाडीत भरतीची वेळ असल्यानं मनसुख हिरन यांचा मृतदेह किनाऱ्यावर येणार नाही, असं मारेकऱ्यांना वाटलं. आणि तिथेच त्यांची चूक झाली. त्यांच्या दुर्दैवानं आणि कायद्याच्या सुदैवानं खाडीत भरती न आल्यानं मृतदेह किनाऱ्यावर आला आणि हे सगळं उघडकीस आलं,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times