वाचा:
आपल्या व्हिडिओ संदेशात राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेच्या वेळच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ‘१५ वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना झाली तेव्हा माझ्या मनात एक धाकधूक होती. मी महाराष्ट्रासाठी नवं काहीतरी उभं करण्यासाठी बाहेर पडलो होतो. पण ते कसं स्वीकारलं जाईल की नाही याविषयी शंका होती. पण १९ मार्च २००६ च्या स्थापना मेळाव्याला आलेली अचाट गर्दी पाहून ही शंका दूर झाली,’ असं राज यांनी म्हटलं आहे.
‘१५ वर्षांपूर्वी माझ्यासोबत आलेली महाराष्ट्र सैनिकांची ती संपत्ती आजही माझ्यासोबत टिकून आहे. कितीही खाचखळगे आले, अडचणींचा डोंगर आली तरी ती शक्ती माझ्यासोबत आहे, यासारखा दुसरा आनंद नाही. काही जण सोडून गेले, जाऊ द्यात. पण माझ्यासोबत सह्याद्रीच्या कड्यासारखे टिकून आहेत, त्यांना मी कधीही विसरणार नाही. पक्षाला जे जे यश मिळेल, त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र तुमच्याच हातून घडेल,’ असा विश्वासही राज यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रही कृतज्ञ राहील!
‘कोणतीही धनशक्ती, राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारणात व राजकारणात मनसैनिकांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, त्यांच्या न्याय्यहक्कांसाठी व स्वधर्म रक्षणासाठी हजारो आंदोलनं केली. मोर्चे काढले. अटका व जेलवाऱ्या कराव्या लागल्या. मनसैनिकांच्या या त्यागाबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहे. महाराष्ट्राच्या मनातही ही भावना सदैव राहील. पराभव पचवूनही तुमच्यातील लढण्याची उर्मी कमी झाली नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला आजही वाटतं की त्यांचा प्रश्न मनसेच सोडवू शकते, या विश्वासातच भविष्यातील उष:कालाची बिजे रोवली आहेत हे विसरू नका. तुमचे श्रम, रक्त वाया जाणार नाही,’ अशी ग्वाही राज यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. वर्धापन दिनानिमित्त १४ मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times