दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्याचं नाव असल्याचा आरोप काँग्रेसनं वेळोवेळी केला होता. त्यावरुन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आज अनिल देशमुख यांनी डेलकर यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे.
‘दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार होते. सात वेळा खासदार राहिलेला व्यक्ती आत्महत्या करतो. तेही मुंबईत येऊन. त्यांनी सुसाईड नोटमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहलं असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. तसंच, डेलकर यांच्या पत्नी व मुलगा यांनीही आपल्याला पत्र लिहत चौकशीची विनंती केली आहे,’ असंही यावेळी गृहमंत्र्यांनी नमूद केलं.
‘मी मुंबईत येऊन आत्महत्या करतोय, त्रास मला तिकडे असला तरी इथे आत्महत्या करतोय. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रफुल्ल पटेल आणि यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल,’ असं डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहलं असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times