चंदीगडः हरयाणा विधानसभेत आज अविश्वास प्रस्ताव सादर होणार आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी युती ही सरकार कोसळण्याच्या चिंतेने अस्वस्थ आहे. तर आता जननायक जनता पार्टीच्या चार आमदारांनी विरोधी सूर लावल्यामुळे जजपा आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे टेन्शन वाढले आहे. अविश्वास प्रस्तावावर पार्टीच्या व्हिपचे पालन केले जाईल, असं टोहाना येथील जजपाचे आमदार देवेंद्र बबली यांनी मंगळवारी सांगितलं. पण या सरकारपासून वेगळे व्हा, हे आम्ही दुष्यंत चौटाला यांना सांगणार आहे. कारण आता जनतेत जाणं अवघड झालं आहे, असंही देवेंद्र बबली म्हणाले.

हरयाणा विधानसभेत टोहाना येथील जजपाचे आमदार देवेंद्र बबली यांनी कृषी कायद्यांना विरोध करत आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर बरवाला येथून जजपाचे आमदार जोगीराम सिहाग, नारनौदचे आमदार रामकुमार गौतम आणि गुहला येथील आमदार आणि जजपा विधिमंडळ पक्षाचे उपनेते इश्वर सिंह यांनीही तिखट सवाल करत आपल्या पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांच्या अडचणीत भर टाकली.

जनतेत जायचं असेल तर लोखंडी हेल्मेट घालावे लागतील

हरयाणा विधानसभेत बुधवारी सत्ताधारी भाजप, जजपा युतीला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जजपाने व्हिप जारी करत पक्षाच्या नाराज आमदारांचे हात बांधले आहेत. पार्टीने काढलेल्या व्हिपमुळे अविश्वास ठरावावेळी आपण सरकार सोबत राहू. पण पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सत्ताधारी युतीतून बाहेर पडावं, असं देवेंद्र बबली म्हणाले.

आम्ही सहज घेतलं तर जनता आम्हाला चोपून काढेल. आम्हाला लोखंडी हेल्मेट बनवावे लागतील. खासकरून जजपाच्या आमदारांना. कृषी कायद्यांसंबंधी शेतकऱ्यांची समस्या सोडवल्या नाही तर जजपाने सत्तेतील युतीतून बाहेर पडलं पाहिजे. जनता आमच्यावर नाराज आहे. कृषी कायद्यांमुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कोणत्याही मंत्र्याला आपल्या मतदारसंघात जाण्यास धजावत नाहीए, असं देवेंद्र बबली यांनी सांगितलं.

दोन तासांच्या चर्चेनंतर मांडला जाणार विश्वासदर्शक ठराव

विधानसभेत बुधवारी १० वाजता पहिला तास प्रश्नोत्तराचा असेल. यानंतर काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावार दोन तास चर्चा होईल. काँग्रेसचे सात आमदार चर्चेत सहभागी होतील. त्यांची नावं दिली गेली आहेत. चर्चेनंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान घेतले जाईल, असं हरयाणा विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here