म. टा. विशेष प्रतिनिधी,

लॉकडाउन कालावधीत आणि लॉकडाउन शिथिल केल्यानंतर मुंबईत अवैध बांधकामांचा ‘मीटर’ मात्र जोरात सुरू आहे. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पालिकेकडे अवैध बांधकामांच्या तब्बल १३ हजारांहून अधिक तक्रारी आल्या असून साडेनऊ हजार अवैध बांधकामांची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त ४६६ बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात मुंबईत किती अवैध बांधकामांच्या तक्रारी आल्या, कितींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, याची माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पालिकेकडून घेतली आहे. पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात ऑनलाइन प्रणालीवरील २५ मार्च २०२०पासून २८ फेबुवारी २०२१पर्यंतची माहिती देण्यात आली आहे. पालिका दरवर्षी सुमारे १५ हजार अवैध बांधकामांना नोटिसा देते तसेच कारवाईसाठी पोलिस बंदोबस्तापोटी २० कोटी रुपये खर्च होतात. मात्र प्रत्यक्षात कारवाई वीस टक्क्यांपेक्षा अधिक बांधकामांवर देखील होत नाही, अशी माहिती शकील शेख यांनी दिली.

त्यानंतरही कारवाई का नाही?

लॉकडाउनच्या काळात पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागासह सर्वच विभागातील कर्मचारी करोना उपाययोजनांशी संबंधित कामांमध्ये व्यग्र होते. त्याचा गैरफायदा भूमाफिया, झोपडीदादा या असामाजिक तत्त्वांनी उचलून मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली आहेत. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पालिकेचे जवळपास सर्वच विभाग आपल्या नियमित कामावर रूजू झाले आहेत. त्यानंतरही पालिकेला ही बांधकामे पाडावीशी वाटलेली नाहीत, याकडे लक्ष वेधले जात आहे.

कुर्ला, गोवंडी, मानखुर्दमधून सर्वाधिक तक्रारी

पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द या भागांतून अवैध बांधकामांच्या सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. सुमारे १२०० ते ३२५० इतके हे प्रमाण आहे. कुर्ला परिसरात साकीनाका येथील खैरानी रोड भागात सर्वांत जास्त अवैध बांधकामे आहेत. फरसाण कारखाना, अवैध गॅरेज, गोदामे यांची संख्या मोठी आहे. या भागात गेल्या दोन वर्षांत मुंबईतील सर्वाधिक आगी लागल्या आहेत. गोवंडी, मानखुर्द ही धारावीनंतरची दाट लोकसंख्येची झोपडपट्टी असून अवैध झोपड्या आणि नळ जोडण्या यांच्या अधिक तक्रारी पालिकेला या परिसरातून येतात.

विभाग… तक्रारी… अवैध बांधकामे… कारवाई

कुलाबा ए… ३२… २४… १

सँडर्हस्ट रोड बी… ३६८… १८२… २

काळबादेवी सी… ६१४…. ३८९… २४

ग्रँट रोड डी… १५१… ७८… १५

भायखळा ई… ५७९… ४३६… ०

माटुंगा एफ-उत्तर… १४८… ९०… ९

परळ एफ-दक्षिण… २९७… २१४… ३

दादर जी-उत्तर… २०३… १८०… ७

वरळी जी-दक्षिण… २१२… १२२… १५

वांद्रे एच-पूर्व…. ४५१… २३२… ११

वांद्रे एच-पश्चिम… ५२५… ४२९… २१

अंधेरी के-पूर्व… ४४१… ३९५… ३३

अंधेरी-के पश्चिम… ३४२… ३०२… ५८

कुर्ला एल… ३,२५१… २,००२… ५२

चेंबूर एम-पूर्व… १,१९४… १,१७४… ८

चेंबूर एम-पश्चिम…. १,२१३… ६८७… ३३

घाटकोपर एन… २८०…. २४०… ४

मालाड पी-उत्तर… ४२९…. ३४२… ६२

गोरेगाव पी-दक्षिण… ४१६… २३३… ४

कांदिवली आर-उत्तर… ५९५… ५०५… १४

बोरीवली आर-दक्षिण… ३४८… ३१४… ७५

दहिसर आर-मध्य… ३९८… १९६… ४

विक्रोळी एस… ५८९… ५५२… ८

मुलुंड टी… २४९… २४०… ३

कालावधी : मार्च २०२० ते २८ फेबुवारी २०२१

ऑनलाइन तक्रारी : १३,३२५

दुबार तक्रारी : ३,७६७

अवैध बांधकामे : ९,५५८

पाडकामे : ४६६

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here