म. टा. प्रतिनिधी, : गल्लीत मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास काही युवकांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दानिशोद्दीन शफीयोद्दीन (३०, रा. अंगूरीबाग) याचा चाकूने भोसकून करण्यात आल्याची घटना अंगुरीबाग येथे घडली. हल्ला करणाऱ्या नितीन भास्कर खंडागळे उर्फ गब्ब्या यांनी दानिशसह अन्य दोन युवकांवरही चाकूहल्ला केला. या प्रकरणी हल्लेखोरासह तीन जणांना क्रांतीचौक पेालिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी हल्लेखोर नितीन खंडागळे उर्फ गब्ब्याच्या भावाचे आणि शेख जब्बार उर्फ शम्मू यांच्या भांडणाच्या कारणावरून रात्रीच्या वेळी मुखर्रम किराणा गल्लीतून शेख जब्बार, सलीम आणि बाबा हे तिघे जात होते. या गल्लीतूनच जाणाऱ्या नितीन उर्फ गब्ब्या याने शेख जब्बारसह अन्य दोघांशी रात्री १२ वाजेच्या सुमारास वाद घालण्यास सुरवात केली. नितीन उर्फ गब्ब्याने स्वत:जवळील धारदार चाकू काढून शेख जब्बार उर्फ शम्मू याच्यावर वार केले. हा वार सलीम याला लागला. मध्यरात्री उशिरा हे भांडण होत असताना, आपल्या आजीला भेटून घराकडे दुचाकीवरून जाणारा दानिशोद्दीन शफियोद्दीन हा थांबला. त्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, नितीन उर्फ गब्ब्या याने दानिशोद्दीन शफियोद्दीन याच्यावर चाकूने वार केले. तो रक्ताच्या थरोळ्यात पडला. या दरम्यान शेख जब्बार याच्यावरही नितीन उर्फ गब्ब्याने चाकूहल्ला केला. गल्लीत आरडाओरडा झाल्यानंतर आसपासचे लोक जागे झाले. त्यांनी नितीन उर्फ गब्ब्यासह अन्य तिघांनाही नागरिकांनी पकडून ठेवले. दरम्यान दानिश याच्यासह सलीम आणि शेख जब्बार याला घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घाटीत उपचार सुरू असताना, दानिश याचा बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास मृत्यू झाला. दानिशोद्दीन शफियोद्दीन हा पत्रकार शफियोद्दीन यांचा मुलगा आहे. तो आपल्या आजीला भेटून वडिलांकडे जात होता, अशीही माहिती अंगुरीबाग भागातील नागरिकांनी दिली.

या प्रकरणी मृत दानिश याचा नातेवाइक सय्यद रफियोद्दीन याच्या तक्रारीवरून दानिश याच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या नितीन उर्फ गब्ब्यासह सोमनाथ भास्कर खंडागळे, रत्नमाला भास्कर खंडागळे (६५) आणि दिपाली भास्कर खंडागळे (३३, रा. सर्व अंगूरीबाग) यांच्या विरोधात क्रांतीचौक पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस बंदोबस्तात अंगूरीबाग

शहरातील अंगुरीबागेत गल्लीच्या भांडणातून झालेल्या खुनानंतर हा परिसर मंगळवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आला हेाता. या रस्त्यावरील व्यापारी प्रतिष्ठानासह अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद होती. शिवाय अंगुरीबागेकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नशेखोर नितीन उर्फ गब्ब्या

दोन महिन्यांपूर्वी झालेलया भांडणाचा बदला, नितीन उर्फ गब्ब्याने शेख जब्बार याच्यावर हल्ला करून घेतला. सदर नितीन उर्फ गब्ब्या हा नशेखोर असून त्याने नशेच्या गोळ्या घेऊन हा हल्ला केल्याची चर्चा अंगुरीबाग परिसरात होती. तसेच नितीन उर्फ गब्ब्या याच्या कुटुंबाने त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस आयुक्तांनी दिली भेट

अंगुरीबाग येथे खुनी हल्ल्याची घटना घडल्यानंतर रात्री उशिरा पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी अंगुरीबागेतील घटनास्थळाची पाहणी केली. तसेच घाटीत जाऊन जखमीबाबत माहिती घेतली. यावेळी शहरात नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी नागरिकांनी केली. यावेळी पोलीस आयुक्तांसोबत पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त यांनीही घटनास्थळी पाहणी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here