जयंत सोनोने ।

‘करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना शासनाकडून उपचाराबाबत दर निश्चित करून दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. ही नफा कमावण्याची नव्हे, तर सेवेची वेळ आहे, याचे भान ठेवावे. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल’, असा इशारा अमरावतीच्या पालकमंत्री अॅड. यांनी आज दिला.

यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हा रुग्णालयाच्या नर्सिंग स्कूलमधील लसीकरण केंद्रात करोना प्रतिबंधक लस घेतली. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, प्रमोद कापडे यांच्यासह स्टाफमधील इतरांचेही लसीकरण झाले. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते.

वाचा:

‘करोना प्रतिबंधक लसीच्या रूपाने संरक्षणाचे कवच उपलब्ध झाले आहे. करोनाविरुद्धच्या लढाईला यामुळे बळ मिळाले आहे. ही लस सर्वांपर्यंत पोहोचणार असून, सध्याच्या टप्प्यात ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे. लस पूर्णत: सुरक्षित असून, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तरुणांनीही आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाकूर यांनी यावेळी केले.

‘करोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होणे ही आपल्यासाठी मोठी संधी आहे. प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी चालू टप्प्यात ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे. त्याचबरोबर, इतर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून २७ ठिकाणी विनामूल्य लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय, खासगी रुग्णालयांतही अडीचशे रुपये भरून लसीकरण करता येते,’ अशी माहिती त्यांनी दिली.

वाचा:

लसीकरणाच्या विस्तारासाठी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. ग्रामीण भागात केंद्रे सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी, असे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. ‘साथीच्या नियंत्रणासाठी करोना प्रतिबंधक दक्षता त्रिसूत्रीचे पालन होणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर नियमित करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

लसीकरण केंद्रे

अमरावती शहरात इर्विनमधील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र व ज्येष्ठ नागरिक वॉर्ड, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, बडनेरा येथील शहरी आरोग्य केंद्र, दस्तूरनगरचे मनपा क्लिनीक, मालटेकडीनजिक वसंत हॉल, दसरा मैदानावरील आयसोलेशन मनपा क्लिनीक, महेंद्र कॉलनीतील मनपा क्लिनीक, राजापेठेतील तखतमल होमिओपॅथी कॉलेज, डेंटल कॉलेज, नागपुरीगेटजवळील मनपा हिंदी मुलांची शाळा, भाजीबाजारातील मनपा शाळा येथे लसीकरण केंद्रे सुरू आहेत. त्याचप्रमाणे, तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालय येथेही केंद्रे असून, प्राथमिक आरोग्य केंद्रावरही सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी दिली.

वाचा:

त्याव्यतिरिक्त, खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांसाठी सुजाण कॅन्सर हॉस्पिटल, हायटेक मल्टिस्पेशालिटी, मातृछाया हॉस्पिटल, संकल्प हॉस्पिटल, आरोग्यम इन्स्टिट्यूट, बेस्ट हॉस्पिटल, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल या रुग्णालयांनाही परवानगी देण्यात आली आहे व तिथेही लस उपलब्ध आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here