तेलंगण शासनाने कोरोनाचे नियम पाळून मंदिरे सुरू ठेवली आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगण राज्यातील कालेश्वर येथील त्रिवेणी संगम तटावर अकराव्या शतकापासून विशाल प्राचीन मंदिर स्थित आहे. या शिव मंदिरात एका पाणवठ्यावर दोन शिवलिंग स्थापित आहेत. या अनोख्या बाबींमुळे भाविकांमध्ये वेगळी श्रद्धा आहे. वर्षभर येथे भाविक दर्शनासाठी येत असतात.
गोदावरी-प्राणहिता-सरस्वती त्रिवेणी संगम तटावर असलेल्या शिव मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात काकतिय नागवंशी राजांनी केली. या धार्मिक स्थळाला भाविक दुसरी काशी असेही म्हणतात. धार्मिक स्थळ कालेश्वर येथे येणारे भाविक नदीत पवित्र स्नान करून सर्वप्रथम भगवान गणेशाचे दर्शन घेतात. त्यानंतर भगवान शंकराचे दर्शन घेतात. संगम तटावर गोदावरी,प्राणहिता नदी प्रत्यक्ष पाहता येते.
क्लिक करा आणि वाचा-
तसेच सरस्वती नदी अंतर्मुखी आहे, असा समज भाविकांमध्ये आहे. तर मंदिराच्या आत विराजमान दोन शिवलिंगाचा अभिषेक आणि पूजेदरम्यान चढवण्यात आलेले जल हे शिवलिंगाच्या नासिकेमधून भूसुरुंगाद्वारे माता सरस्वती नदीचे रूप घेऊन संगमस्थळी अंतर्मुखी होऊन समाविष्ट होते. त्यामुळे या संगमाला त्रिवेणी संगम असेही म्हणतात, असे कालेश्वर प्रशासनाचे मत आहे.
संगम तटावरील मंदिर परिसरात अन्य मंदिरेही आहेत. यामध्ये श्री शुभानंदादेवी मंदिर, सरस्वती देवी मंदिर, श्री राम मंदिर, आदिमुक्तेश्वर मंदिर, दत्तात्रेय मंदिर, संगमेश्वर मंदिर, अंजनेय मंदिर, सूर्य मंदिर आदी मंदिरांचा समावेश आहे. इंद्रावती व प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती झाल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची गर्दी उसळते.
क्लिक करा आणि वाचा-
करोनामुळे भाविकांच्या गर्दीवर परिणाम
संगम तटावरील शिव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी उसळते. परंतु, या वर्षी कोरोनामुळे भाविकांची गर्दी कमी असल्याचे दिसून येत आहे. तरीसुद्धा भाविक दर्शन घेण्यासाठी कालेश्वर मंदिराला पहिली पसंती दिली असून जिल्ह्यातील असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचले आहे. गर्दी टाळण्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times