नवी दिल्लीः देशात एकीकडे करोनावरील ( ) लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना दुसरीकडे करोनाचा प्रादुर्भाव ( ) वेगाने वाढत आहेत. खासकरून महाराष्ट्राच्या ( ) बाबतीत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तसंच करोना संसर्गाला सहजतेने घेऊ नका, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. महाराष्ट्रातील करोना संसर्गाचे नवीन रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. देशाला करोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल म्हणाले.

एका पत्रकार परिषदेत व्ही. के. पॉल यांनी देशातील करोना संसर्गाच्या स्थितीसंदर्भात माहीती दिली. महाराष्ट्राबाबत आम्ही फार चिंतेत आहोत. महाराष्ट्रात वाढत असलेला प्रादुर्भाव हा गंभीर प्रश्न आहे. करोना संसर्ग सहजतेने घेऊ नका. तसंच करोनामुक्त व्हायचं असेल तर करोना संबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावच लागेल, असं व्ही. के. पॉल म्हणाले.

महाराष्ट्रातील स्थिती गंभीर होत चालली आहे. करोनाच्या नवीन प्रकारामुळे हा संसर्ग वाढत असल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही. हा प्रादुर्भाव चाचण्यांमध्ये आलेली कमी, बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा आणि त्यांचा शोध घेण्यात येणाऱ्या उणीवामुळे करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, असं आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले.

महाराष्ट्रात सर्वाधिक १ लाख अॅक्टिव्ह रुग्ण

देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १ लाखाच्यावर गेली आहे. मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरातमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. आम्ही या राज्यांसोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. या सर्व राज्यांनी आता कंबर कसून मैदानात उतरावं, असं आम्ही सांगितलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

महाराष्ट्रातील ८ शहरांमध्ये करोनाचा कहर

देशात करोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या १० शहरांमध्ये महाराष्ट्राती ८ शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, अमरावती, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, केरळमधील एर्नाकुलमध्ये आणि कर्नाटकमधील बेंगळुरूमध्ये करोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात करोनाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रादुर्भावामुळे सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. यानुसार नागपुरात १५ ते २१ मार्च पर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. भाजीपाला, फळ दुकानं, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मात्र सुरूच राहतील. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक भागांमध्ये लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या २४ तासांत देशात करोनाचे २२,८५४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १३, ६५९ रुग्ण हे फक्त महाराष्ट्रातील आहे. म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे फक्त महाराष्ट्रातले आहेत. यानंतर केरळमध्ये २४५७, पंजाबमध्ये १३९३ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरयाणात नवीन रुग्ण वाढत आहेत. देशात सध्या १,८९,२२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here