Update: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी होण्याची दाट शक्यता आहे. मात्र परीक्षेची नेमकी तारीख शुक्रवारी १२ मार्च रोजी राज्य लोकसेवा आयोगामार्फत जाहीर केली जाणार आहे. राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. येत्या रविवारी ही परीक्षा होणार होती, पण वाढत्या करोना संक्रमणामुळे राज्य लोकसेवा आयोगाने ती लांबणीवर टाकली. याचे राज्यभर उमेदवारांमध्ये तीव्र पडसाद राज्यात उमटले.

विद्यार्थ्यांच्या भावनांशी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी परीक्षा पुढे ढकलत आहोत. शुक्रवारी आयोगामार्फत ही तारीख जाहीर केली जाणार आणि ही तारीख येत्या आठवड्याभरातच होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी जनतेशी संवाद साधला. सुरुवातीलाच त्यांनी एमपीएससी परीक्षेविषयीचे स्पष्टीकरण दिलं. ‘जो कर्मचारी वर्ग परीक्षेच्या कामाला लागणार होता, तो सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्या कामी लागला आहे. या कर्मचारी वर्गाची या काही दिवसात तयारी करावी लागेल. परीक्षार्थींनी आपली तयारी ठेवावी, येत्या ८ दिवसांत परीक्षा होणार,’ असे सांगून ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं.

दरम्यान, आज दुपारी परीक्षा लांबणीवर पडल्याचे कळताच हजारोंच्या संख्येने उमेदवार रस्त्यावर उतरू लागले. पुण्यातून या उद्रेकाला सुरूवात झाली. तेथे उमेदवारांनी रास्ता रोको केला. त्यानंतर कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव येथेही उमेदवारांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत नाराजीचा सूर लावला.

हेही वाचा:

वयाची मर्यादा आडवी येणार नाही

एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा लांबणीवर पडल्याने वयाची मर्यादा आडवी येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी उमेदवारांनी दिली.

परीक्षेवरून राजकारण नको

राज्य सेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांनी कळकळीचं आवाहन केलं की तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी राजकारण करत असेल तर कृपया अशा लोकांना बळी पडू नका. कोणी भडकवत असेल तर भडकू नका, असं ते म्हणाले.

एमपीएससीचीच परीक्षा का होत नाही?

एकीकडे आठवडाभरापूर्वी आरोग्य विभागाची भरती परीक्षा झाली, यूपीएससी, जेईई, बँकिंग अशा सर्व परीक्षा होत असताना केवळ एमपीएससी पूर्व परीक्षाच लांबणीवर का टाकण्यात येत आहे, असा संतप्त विद्यार्थ्यांचा सवाल होता. एमपीएसी परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी झाले, मार्गदर्शक सूचना आल्या आणि आयत्या वेळी परीक्षा स्थगित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या संतापाला तोंड फुटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here