नवी दिल्लीः हरयाणातील अंबालानंतर आता पश्चिम बंगालमधील हाशिमारा विमानतळावर आता राफेलची दुसरी स्क्वाड्रन ( ) तैनात होणार आहे. येत्या एप्रिलपर्यंत याचे काम पूर्ण केले जाईल. फ्रान्समध्ये पायलटचे प्रशिक्षणही त्याच काळात पूर्ण होणार आहे. हाशिमारा विमानतळ हे उत्तर बंगालमधील चीन-भूतान ट्रायजक्शनजवळ आहे.

राफेल सौदा आणि भारतला हस्तांतर

भारताने फ्रान्ससोबत २०१६ मध्ये ५९ हजार कोटी रुपयांचा ३६ राफेल विमानं खरेदीचा सौदा केला होता. यात ३० लढाऊ विमानं आणि ६ प्रशिक्षण देणाऱ्या विमानांचा समावेश आहे. प्रशिक्षणासाठी असलेली विमानं ही २ सीटर असतील. म्हणजे त्यात दोन पायलट असतील. त्यात लढाऊ विमानांची सर्व वैशिष्ट्ये असतील. भारताला गेल्या वर्षी जुलैमध्ये पहिल्या टप्प्यात ५ राफेल लढाऊ विमानं मिळाली.

गेल्या वर्षा २७ जुलैला ७ भारतीय पायलट्सनी राफेल घेऊन फ्रान्समधून उड्डाण केलं आणि ७००० किमीचा प्रवास करून ते २९ जुलैला भारतात दाखल झाले. २०१९ मध्ये दसऱ्याला ही राफेल विमानं भारताला सोपवण्यात आली होती. त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदू परंपरेनुसार राफेल विमानांची पूजा केली होती.

आतापर्यंत ११ राफेल विमानं भारताला मिळाली

भारताला गेल्या वर्षी जुलै अखेर ५ राफेल लढाऊ विमानं मिळाली. दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला आणखी ३ विमानं मिळाली. यानंतर २७ जानेवारीला आणखी ३ राफेल विमानं भारताला सोपवण्यात आली. यानुसार आतापर्यंत एकूण ११ राफेल भारताला मिळाली आहेत. या मार्च अखेरीस भारताला आणखी ६ राफेल लढाऊ विमानं मिळणार आहेत. यानुसार भारताकडे एकूण १७ राफेल विमानं होतील. ही माहिती राज्यसभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ पर्यंत सर्व राफेल विमानं भारताला मिळतील, असं राजनाथ सिंह म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here