म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर पक्ष उभारी घेईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात चित्र उलटे पाहायला मिळत असून, पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मनसेच्या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक यांना पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आले आहे. स्थायी समिती सदस्यनियुक्तीवरून भोसलेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भोसलेंची शिवसेनेशी जवळीक वाढल्याचा अहवाल वरिष्ठांनी ठाकरेंपर्यंत पोहोचवल्यामुळे त्यांना पदावरून हटवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मनसेचा गड असलेल्या नाशिकमध्ये पक्षाची सध्या केविलवाणी अवस्था आहे. भाजप, शिवसेनेने सत्ता मिळवण्यासाठी आक्रमकता स्वीकारली असतानाच ताकद असतानाही मनसेचे पदाधिकारी एकमेकांनाच पक्षातून बाद करण्याची चाल सध्या खेळत आहेत. जुन्या नाशिकमधील (कै.) सुरेखा भोसले यांचे कुटुंब राज ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आहे. त्यामुळे पाच वेळा नगरसेवकपदावर राहिलेल्या (कै.) भोसले यांचे पुत्र सचिन भोसले यांची गेल्या वर्षी मध्य विधानसभा निरीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे भोसलेंनी पक्षासाठी अनेक वर्षांपासून मेहनत घेण्यास सुरुवात केली. भोसलेंसह अनेक युवा मनसैनिक पक्षासाठी मेहनत घेत असताना, पक्षातील ज्येष्ठ फळी मात्र त्यांच्या कार्यात अडथळे आणत असल्याच्या तक्रारी राज ठाकरेंपर्यंत पोहोचल्या आहेत. पक्षाच्या वरिष्ठांकडून आडकाठी आणली जात असल्याची तक्रार मध्यंतरी युवा फळीने ठाकरेंपर्यंत केली होती. यांच्या नाशिक दौऱ्याने पक्ष एकदिलाने व जोमाने कामाला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. या दौऱ्यात शक्तिप्रदर्शन करणाऱ्या भोसलेंचीच दांडी उडवण्यात वरिष्ठांना यश आले आहे. भोसलेंना निरीक्षकपदावरून हटवल्याचे पत्र राजगड कार्यालयाला प्राप्त झाले आहे. काम करणाऱ्यांनाच घरचा रस्ता दाखवला जात असल्याने युवा फळीमध्ये नाराजी आहे.

स्थायीची खदखद नडली

भोसलेंनी स्थायी समितीच्या निवडणुकीत अॅड. वैशाली भोसले यांना डावलल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. पक्षांतर्गत असलेली खदखद त्यांनी शिरीष सावंत यांच्यासमोरच जाहीर केल्याने स्थानिक वरिष्ठ नेत्यांची नाराजी त्यांनी आधीच ओढवून घेतली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधातील पुरावेच राज ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यात आले. नाशिक पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत अॅड. भोसले यांनी पक्षाला विचारात घेतले नसल्याची तक्रार आधीच पोहोचली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते सुनील बागूल यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर सचिन भोसलेंचे फोटो झळकले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण तयार होऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलेल्या नेत्यांनी भोसलेंच्या तक्रारीत भर घातली. त्यामुळे भोसलेंचा पत्ता कापण्यात आल्याची चर्चा आहे.

गेली १५ वर्षे माझे कुटुंब मनसेशी एकनिष्ठ आहे. तरीही राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय मला मान्य असून, ते सांगतील ती जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. माझी कोणाही विरोधात तक्रार नाही.

– सचिन भोसले

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here