करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज करोना आढावा बैठक घेतली आहे. यावेळी या बैठकीत करोनाचा संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सहा प्रकारचे निर्बंध लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
पुण्यात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला नसला तरी काही गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. विवाह समारंभ आणि अन्य समारंभांना ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. तसंच, खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर पाचपेक्षा जास्त लोकांनी गर्दी केल्यास महापालिका आणि पोलिसांकडून कारवाई होणार आहे.
मॉल चित्रपटगृहे १० वाजतांच बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, हॉटेलदेखील १० वाजता बंद केली जातील. मात्र, पार्सल सेवा रात्री अकरापर्यंत सुरु राहणार आहे. हॉटेल ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. त्याचे उल्लंघन केल्यास संबंधित हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल होणार. हॉटेल चालकांनी बाहेर फलक लावून किती आसनक्षमता आहे, ही माहिती देणे बंधनकारक आहे. सोसायटीतील क्लब हाऊस पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.
एमपीएससी परीक्षा असल्यानं यूपीएससी आणि एमपीएससीची अभ्यासिका ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, शाळा कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. फक्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मुभा मिळणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times