सोलापूर: रत्नागिरी – या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीसाठी, खाजगी कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर मुरूम उपशाला विरोध करण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील कुरुलच्या ग्रामस्थांनी पुणे – विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. सदरचा उपसा हा दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीनं केला असून त्यामुळं कुरुलसारख्या असंख्य गावातील रस्ते, पाझर तलाव आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कंपनी स्थानिक गावकऱ्यांना जुमानत नसल्यानेच आज ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी आज हा रास्ता रोको केला.

राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या रस्तेबांधणीसाठी रस्ते उभारणीच्या आजूबाजूच्या गावांमधून कोट्यवधी रुपयांचा मुरूम उपसा सुरु आहे. गावशिवारतल्या पाझर तलावांमधून तसेच शेतकऱ्यांच्या शेताजमिनीतून हा बेकायदेशीर उपसा सुरु असून रस्ते बांधणी कंपन्यांनी भरलेली रॉयल्टी आणि प्रत्यक्षात उपसेलला मुरूम यांचं व्यस्त प्रमाण आहे. रॉयल्टी भरल्याचा दावा करून रस्ते बांधणी कंपन्यांचे व्यवस्थापक स्थानिक गावकऱ्यावर दबाव टाकून बेसुमार मुरूम उपसा करत आहेत. त्यामुळं एका मुख्य रस्त्यासाठी आजूबाजूच्या गावांसाठी सरकारनं बांधलेल्या कोट्यावधी रुपयांची वाट लागली आहे.

शिवाय गावपाणीपुरवठ्याच्या पाझर तलाव आणि शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे.त्यामुळं ग्रामस्थांकडून आंदोलनाचं हत्यार उपसण्यात येत आहे.कुरुल पाझर तलाव क्र.१ मधून मुरुम उपशासाठी शासनाकडुन दिलीप बिल्डकॉन कंपनीला ६२ हजार ब्रासची व जमिनीपासून ३ मिटरची परवानगी देण्यात आली आहे.मात्र गेली ४ महिने या तलावातुन मुरुमाचा बेसुमार उपसा सुरु असुन सुमारे दिड लाख ब्रास व १५ ते २० मिटर खोदाई झाली आहे. यामुळे तलावाला धोका निर्माण झाला आहे.

भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर त्यामध्ये पाणी राहणारच नाही, परिणामी तलावाखाली असणाऱ्या सुमारे ५०० एकर शेतीत दलदल झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय याच तलावात राष्ट्रीय पेयजल योजनेतुन कुरुल ग्रामपंचायतीची विहिर आहे. या विहिरीला देखील धोका निर्माण झाला असुन भविष्यात १५ हजार लोकसंख्या असलेल्या कुरुल ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येईल अशी धास्ती आहे. तर जंगली प्राण्यांना, गाई-गुरे व जनावरांना तलावात पिण्यासाठी पाणी राहणार नाही. त्यामुळं संतप्त गावकऱ्यांनी मुरूम उपशाचे काम बंद पाडून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळं पुणे – विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. त्यामुळं दुतर्फा जवळपास ६ किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here