अमरावती: अनुकंपा कोट्यातून नोकरी मिळत नाही म्हणून नैराश्यात गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन केल्याची हृदयद्रावक घटना येथील हरिहर नगर येथे ११ मार्च रोजी घडली.

चेतन अमरलाल बेठे ( वय २५ , रा. परतवाडा, सध्याचा मुक्काम हरीहर नगर, धारणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या आई आणि दोन लहान भावंडांना सोबत घेऊन हरिहर नगरात राहत होता. त्याचे वडील अमरलाल बेठे हे धारणी येथील तहसील कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. परंतु, आठ वर्षांपूर्वी वडील अमरलाल बेठे यांचे एका दुर्धर आजाराने निधन झाले होते. वडिलांची छत्रछाया हरवल्यामळे लहान वयातच चेतनच्या खांद्यावर आई आणि दोन लहान भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली होती.

आई अशिक्षित व दोन्ही भावंडे ही वयाने लहान असून, ते शिक्षण घेत असल्यामुळे अमर याने घरातील कर्ता पुरूष आणि वडिलांचा वारसाहक्क मिळावा म्हणून अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी संबंधित कार्यालयाकडे रितसर अर्ज दाखल केला होता. यादरम्यान वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार चकरा मारूनही त्याला साध्या कारकूनपदावर देखील नोकरी मिळाली नव्हती. टाळेबंदीतून हाताला काम नाही, रोजगार नाही, बेरोजगारीचा डोंगर, आई आणि दोन्ही भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी अशा जबाबदाऱ्या त्याच्यावर पडल्या. नोकरी मिळत नसल्याने तो नैराश्यात होता. अमरने अखेर ११ मार्च रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेवेळी तो घरात एकटाच होता. त्यांच्या व्यतिरिक्त घरात इतर दुसरे कुणीच नव्हते.

घरातील इतर सर्व जण हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. अमरचे काका नंदलाल हे त्याला भेटायला घरी आले, तेव्हा त्यांना अमरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत नंदलाल यांनी धारणी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या माहितीनंतर धारणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. मृतदेह धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून उत्तरीय तपासणीनंतर तो कुटुबीयांच्या ताब्यात दिला. पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर हे करत असून, अमरच्या मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here