परभणी: जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, संसर्गाची साखळी तोडण्याच्या हेतूने शनिवारी व रविवारी (१३, १४ मार्च) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी (१२ मार्च) दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनबाबत पालकमंत्री नवाब मलिक यांचा शुक्रवारी दुपारी माध्यमांशी बोलतांनाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला. त्यापाठोपाठ जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

परभणी जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शुक्रवारी (१२ मार्च) रात्री बारा ते सोमवारी (१५ मार्च) सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन, संचारबंदी लागू असणार आहे. परभणी महानगर पालिका हद्द व पाच किलोमीटरचा परिसर तसेच सर्व नगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार, दुकाने, अस्थापना पूर्णतः बंद राहणार आहेत.

दरम्यान, संचारबंदीच्या काळात सर्व शासकीय व खासगी दवाखाने, औषधी दुकाने, लसीकरण केंद्रे, चाचणी केंद्रे, आपत्कालीन व्यवस्था, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेले वाहने, माध्यमांचे प्रतिनिधी, पेट्रोलपंप व गॅस वितरकांना सूट राहणार आहे. दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेत सूट देण्यात आली असून, एकाच ठिकाणी थांबून दूध विक्री करता येणार नाही. या शिवाय करोना लसीकरण केलेल्या व्यक्ती, लसीकरणासाठी जाणार्‍या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे. आरटीपीसीआर, अँटीजन चाचणी करण्यासाठी जाणार्‍या व्यक्तींना, परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी, परीक्षेसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या बस सेवेला सूट राहणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी काढलेल्या या आदेशात नमूद आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here