अहमदाबाद, IND vs ENG : भारतीय संघाची पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्याच्या सुरुवातीला चांगलीच भंबेरी उडाली होती. कारण कर्णधार विराट कोहली यावेळी शून्यावर बाद झाला आणि दोन्ही सलामीवीरांना मिळून फक्त पाच धावा करता आल्या. पण त्यानंतर श्रेयस अय्यरने अर्धशतक साकारत भारताचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. श्रेयस आणि हार्दिक पंड्या यांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२४ अशी धावसंख्या उभारता आली. श्रेयसने यावेळी ४८ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६७ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

इंग्लंडने यावेळी नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. इंग्लंडचा हा निर्णय सुरुवातीला योग्य असल्याचेच दिसत होते. कारण भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात लोकेश राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. जोफ्रा आर्चरने राहुलला यावेळी बाद केले, राहुलला यावेळी फक्त एकच धाव काढता आली. राहुल बाद झाल्यावर भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीच्या रुपात मोठा धक्का बसला. कारण तिसऱ्या षटकात इंग्लंडच्या आदिल रशिदने कोहलीला बाद केले, यावेळी कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. कोहली २०१८ जूनपासून पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० सामन्यात शून्यावर बाद झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

कोहली शून्यावर बाद झाल्यावर भारताचा लवकरच तिसरा धक्काही बसला. सलामीवीर शिखर धवन यावेळी पाचव्या षटकात बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. मार्क वुडने यावेळी धवनला बाद केले आणि त्यावेळी भारताची अवस्था ३ बाद २० अशी झाली होती. पण त्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

भारताच्या ३ बाद २० या धावसंख्येनंतर पंत आणि श्रेयस यांनी काही चांगले फटके मारले. पण यावेळी पंतला मोठी खेळी साकारता आली नाही. कारण पंतला यावेळी २१ धावांवरच समाधान मानावे लागले. पंतने यावेळी २३ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २१ धावा केल्या. पण त्यानंतर श्रेयस मात्र चांगली फलंदाजी करत होता. श्रेयसला यावेळी चांगली साथ मिळाली ती हार्दिक पंड्याची.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here