नवी दिल्ली: रात्रभरात गोरे व्हा, केसांची गळती रोखा, अकाली वृद्धत्वापासून सुटका मिळवा, शारीरिक उंची वाढवा, बुद्धिमत्ता वाढवा, वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी सेक्स पॉवर वाढवा, अशा करून लोकांची फसवणूक करणाऱ्या जाहिरात कंपन्यांना केंद्र सरकारने दणका देण्याचा निर्णय घेतला आहे. गोरे होण्याच्या आणि सेक्स पॉवर वाढवण्याच्या जाहिरातीवर बंदी घालण्यासाठी नवा कायदा करण्याची तयारी केंद्राने सुरू केली आहे. त्यामुळे या खोट्या जाहिराती करून लोकांची दिशाभूल केल्यास संबंधितांना ५ वर्षाची शिक्षा आणि ५० लाखांचा दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या कायद्याचा सुधारित मसुदाही तयार केला आहे.

खोट्या जाहिरातींना रोखण्यासाठी आधीच कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यात आता दुरुस्ती करून तो नव्याने मंजूर करून घेण्यात येणार आहे. जुन्या कायद्यात मोजक्याच आजारांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची तरतूद होती. त्यात आता आणखी नव्या आजारांचा समावेश करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सध्याच्या कायद्यात ७८ आजारांना दूर करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यात आता सेक्स पॉवर वाढवणे, नपुंसकता दूर करणे, शीघ्रपतन, गोरे होणे, अकाली वृद्धत्व दूर करणे, एड्स बरा करणे, स्मरण शक्ती वाढवणे, उंची वाढवणे, लिंग वृद्धिचा दावा, केस गळती रोखणे, स्थूलपणा घालवणे आदी गोष्टींच्या दाव्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या गोष्टींचा दावा करणाऱ्या जाहिराती करणे जाहिरात कंपन्यांना महागात पडणार आहे.

जुन्या कायद्यानुसार पहिल्यांदा या कायद्याचं उल्लंघन केल्यास सहा महिन्याचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येतात. दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास एक वर्षाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जातात. मात्र, नव्या कायद्यातील संभाव्य तरतुदीनुसार पहिल्यांदा गुन्हा केल्यास दोन वर्षांची शिक्षा किंवा दहा लाखांचा दंड ठोठावण्यात येईल. तर दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास पाच वर्षांची शिक्षा आणि ५० लाखापर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरही बंधने

या कायद्याची व्याप्ती केवळ जाहिरातदार कंपन्यांपूरतीच मर्यादित राहणार नसून या कायद्याने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियावरही बंधने येणार आहेत. त्याशिवाय अॅलोपॅथिकशिवाय होमोओपॅथिक, आयुर्वेद, यूनानी औषधांनाही हा कायदा लागू होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here