शहरात जनता कर्फ्यू सुरु असला तरी कृषी उत्पन्न बाजार समिती व भाजीपाला ठोक खरेदी-विक्री सुरु राहणार असल्याने परिसरातील शेतकरी बांधवांनी आपापल्या गाड्या भरून नेहमीप्रमाणे भाजीपाला जळगावला आणला. परंतु प्रशासनाने सोमवारपर्यंत भाजी मार्केट मात्र बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने खरेदीसाठी कोणीही आले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या गावांमधून विक्रीसाठी आणलेला लखो रुपये किमतीचा भाजीपाला उन्हामुळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना अखेर तो फेकून द्यावा लागला. अनेक शेतकरी बांधवांनी गोशाळेमध्ये गुरांसाठी चारा म्हणून भाजीपालला देऊन टाकला. एकीकडे भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु आणि दुसरीकडे भाजी मार्केट पूर्णतः बंद अशा प्रशासनाच्या अत्यंत विसंगत निर्णयामुळे गरीब शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे आज प्रचंड नुकसान झाले.
शेतकरी हवालदिल
प्रशासनाच्या चुकीमुळे एकाच दिवशी मजुरी, वाहतूक खर्च आणि माल फेकून द्यावा लागल्याने प्रत्यक्ष झालेले मोठे नुकसान यामुळे शेतकरी बांधव अक्षरशः हवालदिल झालेत. एकेका गावचा सरासरी ४ लाख रुपयांचा माल वाया गेला. यात जळगाव तालुक्यातील एकट्या वऱ्हाड गावच्या नरेंद्र महाजन व सोमनाथ पाटील ह्या शेतकऱ्यांनी सांगितले की आज आमच्या गावचा जवळ जवळ चार लाखाचा माल वाया परत गेल्यावर प्रत्येकी २००० रुपये मजुरी द्यायची आहे ती कुठून द्यायची? असा संतप्त सवाल भाजीउत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री सुरु ठेवणे आणि किरकोळ भाजी मार्केट बंद ठेवणे हे परस्पर विरोधाभासी निर्णय ही चूक पूर्णपणे प्रशासनाची आहे. त्यामुळे सर्व भाजीपाला उत्पादकांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन शासनाने संवेदनशीलता दाखवावी, अशी आग्रही मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
पहाटे जिल्हाभरातून शेतकरी आपला माल बाजार समितीमध्ये आणू लागल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी भाजीपाला मार्केट चे प्रवेशद्वार बंद करून, शेतकऱ्यांची वाहने रस्त्यावरच अडवली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचा प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकण्याचा इशारा दिला. यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाले होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times