करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात कठोर निर्बंध घेण्यात आले आहेत. तर, काही शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने अचानक राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. यावरून राजकारणही बरंच रंगलं. विरोधी पक्षानं राज्य सरकारविरोधात निदर्शने करत सरकारवर टीका केली आहे. या दोन्ही मुद्द्यांवरुन आज सामना अग्रलेखात विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
‘महाराष्ट्रात करोना संसर्ग वाढू लागला आहे व त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच चिंता व्यक्त केली आहे. हे संकट असेच वाढत राहिले तर नाइलाजाने कडक लॉकडाऊन लादावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामागची भावना विरोधी पक्ष समजून घेणार नसेल तर त्यांचे राजकारण मानवतेचे उरले नसून वैफल्यातून निर्माण झालेली अमानुषता स्पष्ट दिसू लागली आहे,’ अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.
‘एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे. आगीच तेल ओतण्याचे हे धंदे त्यांन आता बंद करावेत. पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय? विरोधी पक्ष, आगीत ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करीत आहे काय?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
‘महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विद्यार्थ्यांना जमवून भिकार राजकारण करीत आहे व विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना सरकारविरुद्ध लढायला भाग पाडत आहे. विद्यार्थी व पोलिसांत झगडा लावायचा व आपण मजा बघायची अशी मानसिकता यात दिसते. अशाने सरकार पाडले जाईल या भ्रमात कोणी असेल तर त्यांनी डोळ्यांवर थंड पाणी मारून जागे व्हावे हेच बरे. आपले सरकार तीन महिन्यांत येईलच येईल, असे भाजपा पुढारी जागेपणी बडबडू लागले आहेत. ते अशी तरुणांची माथी भडकवून शक्य होणार आहे काय?,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times