मुंबईः ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनतर वाझेंची नागरिक सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत धक्कादायक खुलासे केले आहेत. या व्हॉटसअप स्टेटसमध्ये सचिन वाझे यांनी ‘हे जग सोडण्याची’ही भाषा केलीय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे हे मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या मृत्यू प्रकरणामागे वाझे असल्याचा दावा फडणवीस यांनी मनसुख यांची पत्नी विमला यांच्या जबाबाचा आधार घेत केला. त्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडून एटीएसकडे सोपवला आणि पाठोपाठ सचिन वाझे यांची बदलीही करण्यात आली. दरम्यान वाझे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत सीआयडीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

सचिन वाझे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस

३ मार्च २००४ पासून काही सीआयडी अधिकाऱ्यांनी एका खोट्या प्रकरणात मला अटक केली. त्या प्रकरणात आत्तापर्यंत काहीच निष्पन्न झालं नाही.पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. माझे सहकारी मला पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करतायत, असं सचिन वाझेंनी म्हटलं आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. १७ वर्ष माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती. पण आता माझ्याकडे आयुष्याची ती १७ वर्षही नाहीत, ना नोकरी करण्याचा संयम. आता या जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत चालली आहे, असं मला वाटतय, असंही सचिन वाझेंनी म्हटलं आहे. सचिन वाझेंच्या या व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर चर्चेला उधाण आलं आहे.

सचिन वाझेंचा ठाणे कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज

मनसुख यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने सचिन वाझे यांची मॅरेथॉन जबाबनोंदणी झाली. वाझे यांच्यावर पुढे अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसली तरी या प्रकरणात अटकेची भीती त्यांना सतावू लागली आहे. त्यातूनच त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असून या अर्जावर १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here