सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने करोनाचा प्रादुर्भाव रोखणे व ठोस उपाय योजना करण्याच्या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होणारे शिमगोत्सव व होळी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी आज जारी केले आहेत
त्यानुसार ठळक १४ मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक जवळच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर, रॅपिड चाचणी करणे बंधनकारक केली आहे. गाव होळ्या, देव होळ्या, राखण होळया उभ्या करताना ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही या आदेशात नमूद केलं आहे. सर्व मंदिर विश्वस्त व पालखी धारक यांनी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करणे बंधन कारक आहे.
होळीची पालखी पूजा करताना नवस करतेवेळी पेढे ,नारळ, हार आदी स्वरूपातील वस्तू स्वीकारु नयेत तसेच प्रसादाचे वाटप करू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, होळीच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी करु नये तसंच, तीन तीन तासाने वेळ ठरवून कार्यक्रम करावेत मात्र केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतच कार्यक्रम व्हावेत, असंही या आदेशात म्हटलं आहे. पालखी घरोघरी नेण्यात येऊ नये. शबय मागणे, गाव खेळे व नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम टाळावेत. धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळणे टाळावे, असंही म्हटलं आहे.
मुंबईतील चाकरमान्यांसाठी सूचना
मुंबई पुणे येथील ग्रामस्थांनी व चाकरमान्यांनी गावी येणे टाळावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, प्रतिबंधक क्षेत्रातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यास ७२ तासातील rt-pcr निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे बंधनकारक आहे तर, प्रतिबंधक क्षेत्राबाहेरील लोकांना spo-2 टेस्टिंग व थर्मल स्क्रीनिंग करणे बंधनकारक आहे. ग्राम नियंत्रण समिती यांनी ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं या नियमावलीत म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times