म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक झाली असल्याने पुण्यातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने पुण्यासाठी विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेतल्यास पुण्यात दररोज सुमारे एक लाख नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे.

विभागीय आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘करोनाची पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या सर्वाधिक झाली आहे. दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी करायचे असेल; तर लसीकरण हा प्रमुख उपाय आहे. डॉक्टर आणि अन्य तज्ज्ञांच्या मते लसीकरणामध्ये पुण्याला प्राधान्य दिले पाहिजे. केंद्र सरकारच्या धोरणात बदल करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. पुण्यामध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याचा निर्णय झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होऊन सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ शकेल.’

‘सध्या जिल्ह्यात दररोज २३ ते २४ हजार लोकांना लस देण्यात येत आहे. हे प्रमाण वाढविले; तर परिस्थिती आटोक्यात येईल. १६ जानेवारीला पुण्यात ३१ लसीकरण केंद्रे होती. दहा मार्चला केंद्रांची संख्या २०८ झाली आहेत. बहुतांश आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. लशींचा साठा उपलब्ध करून देणे आणि लसीकरण केंद्रांमध्ये आणखी वाढ करण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची सूचना पवार यांनी केली आहे; तसेच खासदार गिरीश बापट आणि श्रीरंग बारणे यांनीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून मागणी मान्य झाल्यास पुण्यात दररोज सुमारे एक लाख नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे,’ असे राव यांनी स्पष्ट केले.

‘चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. ससून रुग्णालयाला निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, त्या ठिकाणी दररोज ७०० ते एक हजार चाचण्या करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) या ठिकाणी चाचण्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,’ असे राव यांनी सांगितले.

जम्बो सेंटर होणार सुरू

‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालात उभारण्यात आलेले जम्बो सेंटर सुरू केले जाणार आहे. दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेने जम्बो सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्याबाबतचा सकारात्मक अहवाल आला आहे. या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ अशी माहिती राव यांनी दिली.

खासगी रुग्णालयांशी करार

‘करोनाबाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्याच्यादृष्टीने करार करण्यास महापालिकांकडून सुरुवात झाली आहे. खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली आहे. राज्य सरकारने उपचाराचे दर आणि खाटा यांबाबत काढलेल्या अध्यादेशाची मुदत २८ फेब्रुवारीला संपली होती. तो अध्यादेश आणखी तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे,’ असे राव म्हणाले.

पीएमपी बसमध्ये उभे राहून प्रवासाला मनाई

‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे पालन होत नसल्यास संबंधितांना पुन्हा सूचना दिल्या जाणार आहेत,’ असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here