उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. तसंच, मुकेश अंबानी यांना पत्राद्वारे धमकीही देण्यात आली होती. कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर, आज सचिन वाझे जबाब नोंदवण्यासाठी एनआयए कार्यालयात पोहोचले आहेत. गेल्या तासाभरापासून त्यांची चौकशी सुरु आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक सापडल्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचच्या टीमकडून तपास सुरु होता. या टीममध्ये सचिन वाझे यांचादेखील समावेश होता.दरम्यान, मनसुख यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने या घटनेला गंभीर वळण लागले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात थेट सचिन वाझेंचं नाव घेऊन आरोप केले. या मृत्यू प्रकरणामागे वाझे असल्याचा दावा फडणवीस यांनी मनसुख यांची पत्नी विमला यांच्या जबाबाचा आधार घेत केला. त्यानंतर सरकारने या मनसुख हत्या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडून एटीएसकडे सोपवला आहे तर, अँटिलिया बाहेरील स्फोटकांचा तपास एनआयएकडे सोपावला आहे आणि पाठोपाठ सचिन वाझे यांची बदलीही करण्यात आली. वाझे यांना शुक्रवारीच मुंबई पोलिसांच्या नागरिक सुविधा केंद्रात बदली देण्यात आली आहे.
वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस
सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत धक्कादायक खुलासे केले आहेत. या व्हॉटसअप स्टेटसमध्ये सचिन वाझे यांनी ‘हे जग सोडण्याची’ही भाषा केलीय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. ३ मार्च २००४ पासून काही सीआयडी अधिकाऱ्यांनी एका खोट्या प्रकरणात मला अटक केली. त्या प्रकरणात आत्तापर्यंत काहीच निष्पन्न झालं नाही.पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय, असं त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times