मुंबई: पुणे जिल्ह्यातील रांजणगावात एका कार्यक्रमात अभिनेत्री मानसी नाईकचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून मानसीच्या तक्रारीवरून मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर तालुक्यातील रांजणगावात युवा सेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मानसीला आमंत्रित करण्यात आले होते. तिथे स्टेजवर मानसी सादरीकरण करत असतानाच एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले व दमदाटी करून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मानसीच्या तक्रारीच्या आधारे तीन जणांवर कलम ३५४ व ५०६ अन्वये साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

नेमका आरोप काय?

मानसी नाईकने तक्रारीत गंभीर असा आरोप केला आहे. मानसी नृत्य सादर करत असतानाच तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. स्टेजच्या मागील बाजूस मला बोलावून घेण्यात आले व प्रथम दमदाटी करून नंतर माझा विनयभंग करण्यात आला, असा आरोप मानसीने तक्रारीत केला आहे. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, मानसी नाईकप्रमाणेच अभिनेत्री भाग्यश्री माटेलाही काही दिवसांपूर्वी अशा प्रसंगातून जावे लागले होते. गडचांदूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी भाग्यश्रीला बोलावण्यात आले होते. मात्र तिथे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मला योग्य वागणूक मिळाली नाही, असा आरोप भाग्यश्रीने केला होता. त्यावरून बरंच काहूर माजलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here