अहमदाबाद, : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात महत्वाचे चार बदल होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

फिरकीपटू युजवेंद्र चहल गेल्या लढतीत आपला शंभरावा ट्वेन्टी-२० सामना खेळला होता. पण या सामन्यात सर्वाधिक धावा या चहलने दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुसऱ्या सामन्याच चहलला वगळण्याचे दाट संकेत मिळत आहेत. चहलच्या जागी यावेळी संघात राहुल तेवातियाचा समावेश करण्यात येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. कारण तेवातिया हा चांगली फिरकी गोलंदाजी करतो, त्याचबरोबर तो मोठे फटकेही लगावतो. त्यामुळे चहलच्या जागी तेवातियाला यावेळी संघात स्थान मिळू शकते.

दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला विश्रांती देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण पहिल्या सामन्यात शार्दुलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात शार्दुलच्या जागी वेगवान गोलंदाज दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते. कारण दीपककडे शार्दुलपेक्षा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर यापूर्वी चहरने चांगली गोलंदाजीही केली आहे.

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माला जर खेळवायचे असेल तर लोकेश राहुल किंवा शिखर धवन या दोघांपैकी एकाला डच्चू द्यावा लागेल. पहिल्या सामन्यात राहुल आणि धवन हे दोघेही अपयशी ठरले होते. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणाला वगळायचे, हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे असेल. राहुल हा यष्टीरक्षणही करू शकतो, त्यामुळे त्याची बाजू ही धवनपेक्षा वरचढ असल्याचे म्हटले जात आहे.

दुसऱ्या सामन्यात भारताला जर आपली फलंदाजी अजून भक्कम करायची असेल तर सूर्यकुमार यादव किंवा इशान किशन यांना संधी मिळू शकते. कारण या दोघांनाही आतापर्यंत आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी दिली तर भारताच्या फलंदाजीली अधिक धार येऊ शकते. पण जर या दोघांपैकी एकाला संधी द्यायची असेल तर कोणाला संघाबाहेर काढायचे, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here