म.टा. वृत्तसेवा, भंडारा

मानवजातीला जगण्याचा अचूक मार्ग दाखविण्यासाठी गावागावात भागवत सप्ताह आयोजित केला जातो. आयुष्याचा उद्धार करण्यासाठी आध्यात्म आणि धार्मिकतेत अडकलेले अनेक भाविक या भागवत सप्ताहाला हजेरी लावतात. परंतु, भागवत सप्ताहात जीवनाचे महत्व सांगणाऱ्या कथित महाराजाने गावातील एका विवाहित महिलेलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा तालुक्यातील मोहदूरा येथे बुधवारी घडला. शुक्रवारी याची माहिती सर्वत्र पसरल्याने विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

मोहदूरा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील एक तरूण महाराजाला बोलविण्यात आले होते. सात दिवस प्रवचनातून त्याने आध्यात्मतेचे बाळकडू भाविकांना पाजले. हा महाराज मागील वर्षीसुद्धा मोहदूरा येथे प्रवचनासाठी आला होता. त्यादरम्यान, त्याने गावातीलच एका तरूण विवाहित महिलेशी सूत जुळविले. त्याने महिलेच्या कुटुंबीयांशी जवळीक निर्माण केली होते. तसेच त्याने तिच्या घरी मुक्कामही केला होता, अशी माहिती आहे. सदर महिलेला एक मुलगीही आहे.

तथापि, ३ फेब्रुवारी रोजी भागवत सप्ताहाचा समारोप झाल्यानंतर महाराज गावातून परत गेला. दोन दिवसानंतर ५ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता महाराजाचा एक माणूस दुचाकीने मोहदूरा येथे आला. त्याने आपली दुचाकी महिलेच्या घरासमोर उभी केली. त्यानंतर महिला त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेली. पत्नीच्या हालचालीवरुन याबाबतची कल्पना तिच्या पतीला आधीच आली होती. त्यामुळे ती घरी दिसत नसल्याचे समजताच पती व सासऱ्याने भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून तपासासाठी महाराजाच्या गावी धाव घेतली. परंतु, ते तिथे नसल्याचे दिसून आले. सध्या दोघांचेही मोबाइल बंद असल्याने त्यांचे लोकेशन मिळत नसून त्यांच्या शोधासाठी पोलिस पथक पाठविल्याची माहिती भंडाराचे पोलिस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी सांगितली.

द्विअर्थी प्रवचनामुळे होता प्रसिद्ध

कथित महाराजाचे दोन अर्थाचे असायचे. अशा प्रवचनामुळे लवकरच तो प्रसिद्ध झाला आणि त्याला गावागावातून प्रवचनासाठी बोलवणे येऊ लागले. सोशल मीडिया, युट्युबवर त्याचे प्रवचनाचे अनेक व्हिडीओसुद्धा आहेत. त्याचे यापूर्वी लग्न झाले असून त्याच्या अशा स्वभावामुळे पत्नी त्याला सोडून गेल्याची माहिती आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here