शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून प्रथमच सरकारसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले. त्यातून ते बाहेर पडतात तोच, पुण्यातील एका युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणात शिवसेनेचे उपनेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळं राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. राठोड यांच्या राजीनाम्यामुळं आधीच बचावात्मक पवित्र्यात असलेल्या सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी जेरीस आणले.
मनसुख हिरन या व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू व मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यामुळं विरोधकांना आयतेच मुद्दे मिळाले. या मुद्द्यांवरून विरोधी पक्षानं सरकारला घेरलं. त्यातच या दोन्ही प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा संबंध असल्याचं समोर आल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले. वाझे यांच्यावर कारवाईची विरोधकांनी मागणी केली. मात्र, सरकारनं त्यांची केवळ बदली केली. मात्र, नंतर स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास एनआयएनं हाती घेतला आणि वाझे यांना अटक झाली. त्यामुळं सरकारचा पाय अधिकच खोलात गेला आहे. भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं सरकारवर आरोप सुरू आहेत. भाजपचं लक्ष्य शिवसेना असली तरी गृहखाते अनिल देशमुख यांच्याकडं असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसही सावध झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवारांनी बैठक बोलावली आहे. राज्य सरकारच्या कारभारात केंद्राचा हस्तक्षेप सातत्यानं वाढत असल्याचा राज्य सरकारचा सुरुवातीपासूनच आरोप आहे. स्फोटकं प्रकरण ‘एनआयए’नं हाती घेतल्यामुळं महाविकास आघाडीची ती भावना अधिकच बळकट झाली आहे. त्यामुळं आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते? पुढची कोणती रणनीती ठरते? याविषयी उत्सुकता आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times