या व्हिडिओत इतर राजकीय पक्ष आणि मीडियामध्ये हिंदू-मुस्लिम, सीएए आणि मंदिर-मशिदीवर चर्चा सुरू असल्याचे दिसत आहेत. तर केजरीवाल विकास, शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षेवर बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओतून इतर पक्षांना खलनायक ठरवण्याचा आणि हे पक्ष धार्मिक राजकारण करत असल्याचं बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे आयोगाने या व्हिडिओची दखल घेऊन केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. या व्हिडिओतून प्राथमिकदृष्ट्या जातीय आणि धार्मिक भावनेच्या आधारे मतदान मागण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसतं. हा प्रकार म्हणजे आचारसंहितेचं आणि लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन आहे, असं आयोगाने नोटीशीत म्हटलं असून त्यावर केजरीवाल यांना उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केजरीवाल यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर भाजपने एक दिवस उलटल्यावर आयोगाकडे तक्रार केली होती. हा व्हिडिओ धार्मिक तेढ निर्माण करणारा असून आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचा आरोप भाजपने केला होता.
या आधीही आयोगाने केजरीवाल यांना त्यांच्या एका वक्तव्यावरून फटकारले होते. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर वकिलांच्या एका संमेलनाला संबोधित करताना संधी मिळाल्यास कोर्ट परिसरात मोहल्ला क्लिनिक उघडण्यात येईल, असं वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी केलं होतं. त्यावेळी आयोगाने केजरीवाल यांना पुन्हा अशी वक्तव्य न करण्याची तंबी दिली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times