रविवारच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी केली. पण यावेळी गोलंदाजांना हाताळताना आणि क्षेत्ररक्षण लावताना कोहलीकडून एक चुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण हे सर्व करत असताना भारतीय संघाला निर्धारीत वेळेत २० षटके पूर्ण करता आली नाही. भारताकडून धीम्यागतीने षटके टाकली गेली आणि त्याचाच फटका आता संघाला बसला आहे. कारण या प्रकरणी आयसीसीने आता भारतीय खेळाडूंना दंड ठोठावला आहे.
दुसऱ्या सामन्यात संथगतीने षटके टाकल्यामुळे आयसीसीने भारतीय संघाला आता दंड ठोठावला आहे. भारतीय खेळाडूंच्या मानधनातून आता २० टक्के एवढी रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कोहलीला आयसीसीने दिली आहे. त्यानंतर कोहलीने आपली चुक मान्य केली आहे. त्यामुळे आता यापुढील सामन्यांमध्ये भारतीय संघाला या गोष्टीपासून सावध राहावे लागणार आहे.
भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा चांगलाच बदला घेतल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची एकही धाव झालेली नसताना पहिला धक्का बसला. पण त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांनी धडाकेबाज फलंदाजी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. इशानने आपल्या पहिल्याच सामन्यात ३२ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५६ धावांची जबरदस्त खेळी साकारली. इशान बाद झाल्यावर विराटने सामन्याची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि संघाला षटकार लगावत विजय मिळवून दिला. कोहलीने यावेळी पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७३ धावांची दमदार खेळी साकारली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times