भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचही ट्वेन्टी-२० सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत. आतापर्यंत मालिकेतील दोन सामने झाले आहेत. पण उर्वरीत तीन सामन्यांसाठी गुजरात क्रिकेट संघटनेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. पण आता उर्वरीत तीन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय आता गुजरात क्रिकेट संघटनेने घेतला असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुजरात क्रिकेट संघटनेने प्रेक्षकांविना उर्वरीत तीन ट्वेन्टी-२० सामने खेळवण्याचे ठरवले आहे. ज्या प्रेक्षकांनी या सामन्यांची तिकीटे काढली होती, त्यांना पैसे परत देण्याचा निर्णयही यावेळी गुजरात क्रिकेट संघटनेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता उर्वरीत तीन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.
गुजरात क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष धनराज नथानी यांनी म्हटले आहे की, ” सध्याच्या घडीला अहमदाबादमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत बीसीसीआयशी चर्चा केल्यानंतर आम्ही उर्वरीत तीन सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश न देण्याचे ठरवले आहे. ज्या चाहत्यांनी या सामन्यांची तिकीटे विकत घेतली आहेत त्यांना आम्ही पैसे परत करणार आहोत. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना मोफ प्रवेशिका मिळाल्या आहेत, त्यांनीही या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये येऊ नये.”
ट्वेन्टी-२० मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहे. ही एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यात खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठीही प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाता येणार नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times