मुंबई: संसर्गाची लागण झाल्यामुळे विलगीकरणासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी दाखल केलेल्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येते. घरी गेल्यानंतरही हे रुग्ण व्यवस्थित काळजी घेतात का, याचा करण्याचे निर्देश पालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. अनेक रुग्ण करोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर व्यवस्थित काळजी घेत नाहीत. लगेच घराबाहेर पडतात. फिरण्यास सुरुवात करतात. या रुग्णांनी योग्यरित्या स्वतःची काळजी घ्यावी, यासाठी आता हा वैद्यकीय पाठपुरावा करण्यात येणार आहे.
वाचा:
ज्या व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणे नाहीत, मात्र जे करोना संसर्गासाठी पॉझिटिव्ह आहेत, अशा व्यक्ती करोना संसर्ग वेगाने पसरवणारे म्हणजेच सुपरस्प्रेडर असतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरगुती विलगीकरणामध्ये असतानाही ज्या व्यक्ती बाहेर दिसतात किंवा घराबाहेर फिरतात, त्यांच्याकडूनही संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता असते. पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यासंदर्भात अनेक कटू अनुभव आले आहेत. वारंवार सांगूनही संसर्ग झालेल्या व्यक्तींकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळेही त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होण्याच्या शक्यता वाढते. रविवारी झालेल्या बैठकीमध्ये याबाबत रुग्णालयांना सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, त्याचवेळी गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडूनही संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मास्क केवळ तोंडावर लावून चालत नाही, तर तो योग्य प्रकारे लावावा लागतो. ज्या व्यक्ती वैद्यकीय उपचार घेत आहेत, त्यांनीदेखील हे सर्व निर्देश योग्य प्रकारे पाळायला हवेत, सुरक्षित अंतराचे निकषांचे पालन करणेही गरजेचे आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
वाचा:
गृह विलगीकरणामध्ये असलेल्यांचे प्रमाण मोठे आहे. अशा अनेक रहिवाशांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसते. हे नियम योग्यप्रकारे पाळले नाही, तर करोना संसर्ग नियंत्रणात राहणार नाही, हे वारंवार सांगूनही सुधारणा होत नसेल तर कडक कारवाई करण्याची वेळ येईल, अशाही सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. एखादी व्यक्ती करोनासाठी संशय़ित असेल व घरामध्ये विलगीकरणात राहणार असेल, तर त्याने कोणती काळजी घ्यावी, हे उपचार देणाऱ्या डॉक्टरांनी सांगायला हवे, याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष वेधले आहे.
खासगी रुग्णालयांचा पर्याय
‘पालिकेच्या वैद्यकीय करोना केंद्रामध्ये किंवा रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या एखाद्या रुग्णाला तेथील उपचारामुळे समाधान न झाल्यास वॉर रूमच्या सहकार्याने खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्याची संमती देण्यात आली आहे. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया वैद्यकीय निकष व पालिकेने दिलेल्या निर्देशांप्रमाणे व्हायला हवी’, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. काळजी न घेतल्यास करोनाचा संसर्ग वाढण्यासाठी हातभार लागू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारे सामाजिक व वैयक्तिक पातळीवरील गैरवर्तन टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times