म. टा. प्रतिनिधी, : ब्लॅक मनी असून तो सांभाळण्यासाठी दोन हजार रूपयांच्या नोटांची आवश्यकता आहे. २५ लाख रुपये मूल्याच्या दोन हजार रूपयांच्या चलनी नोटा दिल्यास, दुप्पट मूल्याच्या अर्थात ५० लाख रुपये मूल्याच्या पाचशेच्या नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून येथील हॉटेल व्यवसायिकाला २५ लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन, डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

प्रवीण प्रकाश वनकुंद्रे (वय ४८, रा. काळेवाडी), मालेश सुरेश गावडे (वय ४२, रा. चिंचवड) आणि व्यंकटरमण वसंतराव बाहेकर (वय ४०, रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. याबाबत शिवणे परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षांच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. कसबा पेठेतील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयासमोर २३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.

सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. आरोपी वनकुंद्रे व तक्ररादार यांची जुनी ओळख आहे. त्यांच्या ओळखीतूनच तक्रारदार यांनी नाशिक येथील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या एका कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र, त्यामध्ये तक्रारदार यांना तोटा झाला. तो तोटा भरून काढण्यासाठी आरोपी वनकुंद्रे याने इतर आरोपींशी ओळख करून दिली. फरार आरोपी रेड्डी याच्याकडे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी आहे. त्या नोटा पाचशे रूपयांच्या असल्यामुळे त्या सांभाळण्यास आवघड जात आहेत. तुम्ही दोन हजार रूपयांच्या २५ लाख रूपयांच्या नोटा दिल्यास तुम्हाला ५० लाख रूपयांच्या पाचशेच्या नोटा देऊ, असे आमिष दाखविले. तक्रारदार यांना देखील फायदा होत असल्यामुळे आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्यांना दोन हजार रूपयांच्या २५ लाख रूपयांच्या नोटा देण्याचे कबुल केले. त्यानुसार कसबा पेठेतील जन्म-मृत्यू कार्यालयासमोर आरोपींना तक्रारदार यांनी २५ लाखांच्या नोटा दिल्या. त्यावेळी आरोपींनी त्यांना पाचशे रुपयांच्या नोटा असलेली बॅग दिली. त्यामध्ये कागदी बंडल होते. तक्रारदार यांनी ते नंतर उघडून पाहिल्यानंतर हा सर्व फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here