अहमदाबाद, : प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला पुन्हा एकदा या सामन्यात धक्के बसले. या मालिकेच्या पहिल्या सामन्यातही भारताला प्रथम फलंदाजी करताना असेच धक्के बसेल होते आणि भारताचा माफक धावसंख्या उभारता आली होती. पण या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी केली खरी, पण भारताला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण विराट कोहलीने यावेळी अर्धशतक झळकावत एकाकी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. भारताला यावेळी इंग्लंडपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवता आले.

इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. आतापर्यंत सातत्याने अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला या सामन्यात एकही धाव करता आली नाही. गेल्या तीन सामन्यांमध्ये राहुलला फक्त एकच धाव काढता आली आहे. या सामन्यातही राहुल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. राहुल बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि इशान किशन हे दोघे मुंबई इंडियन्सचे खेळाडू खेळपट्टीवर होते.

या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माला यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. रोहितला यावेळी दोन चौकारांच्या जोरावर १५ धावा करता आल्या. त्याचबरोबर गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या इशान किशनलाही यावेळी जास्त धावा करता आल्या नाहीत. किशनला यावेळी फक्त चार धावांवर समाधान मानावे लागले

भारतीय संघाची सहाव्या षटकात ३ बाद २३ अशी अवस्था झाली होती. यावेळी रिषभ पंत आणि विराट कोहली यांनी चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण यावेळी विराट कोहलीच्या एका चुकीमुळे पंतला यावेळी धावचीत व्हावे लागले. एका चेंडूंवर जोरदार फटका लगावून पंतने दोन धावा घेतल्या होत्या. त्यानंतर यष्टीरक्षकाने चेंडू स्टम्पवर मारण्याचा प्रयत्न केला, पण तो लागला नाही. त्यावेळी कोहलीने पंतला तिसरी धाव घेण्यासाठी सांगितले. कोहली यावेळी सहजपणे क्रीझमध्ये पोहोचला, पण पंतला यावेळी धावचीत होऊन तंबूत परतावे लागले. पंतला यावेळी २५ धावांवर समाधान मानावे लागले. पंतनंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरलाही जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. एक मोठा फटका मारण्याच्या नादात श्रेयस बाद झाला, त्याला ९ धावाच करता आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here