मागील काही दिवसांपासून ते दिल्लीतच वास्तव्यास होते. प्रकृतीच्या तक्रारींमुळं त्यांनी अलीकडेच करोना चाचणी करून घेतली होती. ती चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मंगळवारी रुग्णालयात दाखल झाले होते. तिथं दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.
गांधी सलग तीन वेळा नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. १९९९ मध्ये ते प्रथम खासदार झाले. २००३ ते २००४ या काळात केंदातील भाजपच्या सरकारमध्ये ते जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री होते. पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचा चांगला संपर्क होता. त्या माध्यमातून पक्षाचे अनेक नेत्यांना त्यांनी नगरमध्ये आणले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकरली.
नगर शहराच्या राजकारणातही त्यांचा मोलाचा वाटा होता. पक्षाचे ते बराचकाळ शहरजिल्हाध्यक्ष होते. नगर पालिका असताना नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पुढाकारातून सध्या राष्ट्रवादीला सोबत घेत महापालिकेत भाजपची सत्ता आहे. खासदार असताना नगर शहरासह मतदारसंघातील ग्रामीण भागातही त्यांनी अनेक योजना राबविल्या. पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी नेते अशी त्यांची ओळख होती. काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचेही करोनामुळे निधन झाले. त्यानंतर आता गांधी यांचे निधन झाले. नगरचे दोन हिंदुत्ववादी नेते करोनामुळे गमावल्याच्या भावना नगरकरांमध्ये आहेत.
गांधी येथील नगर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात बँकेतील गैरप्रकारासंबंधी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये काही आरोपींना अटकही झाली आहे. बोगस कर्जवाटप झाल्याचा गुन्हा पुण्यातही दाखल झाला आहे. या प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष म्हणून गांधी यांचीही चौकशी होणार होती. त्यासंबंधीच त्यांची सध्या धावपळ सुरू होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times