म. टा. प्रतिनिधी, : समृद्ध जीवन फाउंडेशनचे संचालक महेश मोतेवार याने दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने () ताब्यात घेतले. ठेवीदारांच्या पैशातूनच दागिने अर्पण केल्याचे तपासात समोर आल्यानंतर ‘सीआयडी’ने ही कारवाई केली.

समृद्ध जीवन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या अमिषाने देशभरातील गुंतवणुकदारांना तब्बल दोन हजार ५१२ कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणी मोतेवारची २०७ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली होती. मोतेवारला या प्रकरणात २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. ठेवीदारांकडून घेतलेल्या पैशांमधून मोतेवार याने २०१३ मध्ये दगडूशेठ गणपतीला सोन्याचा हार, त्रिशुळ, परशु असे ६० लाख ५० हजार रुपयांचे दीड किलोचे दागिने अर्पण केले होते. ‘सीआयडी’ने मोतेवारला अटक केल्यानंतर तपासात ही बाब समोर आली होती. याबाबत ‘सीआयडी’च्या उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा पाटील यांनी सांगितले, की ‘मोतेवारने गुंतवणूकदारांच्या पैशांचा वापर कोठे केला याचा शोध घेतला जात होता. त्या वेळी या दागिन्यांविषयी माहिती मिळाली. गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या पैशांतूनच त्याने हे दागिने घेतल्याचे समोर आले. त्यानंतर आम्ही ट्रस्टशी संपर्क साधला. धर्मादाय आयुक्तांना हे दागिने तपासकामासाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टला पत्र दिले. त्यानुसार दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांनी संपूर्ण सहकार्य करून हे दागिने आमच्या ताब्यात दिले आहेत.’ यापूर्वी महेश मोतेवार यांच्याकडून ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘सीआयडी’चे अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

‘आदेशानुसार दागिने परत दिले’

‘गोरगरिबांचा तळतळाट घेऊन अर्पण केलेले दागिने बाप्पाही स्वीकारणार नाही, अशी आमची भावना आहे. बाप्पाला जेव्हा कोणी एखादी वस्तू अर्पण करतो, तेव्हा तो कोण आहे याची काही माहिती आम्हाला नसते. मात्र, भावना आणि कायदा यात गल्लत होता कामा नये. आम्ही कायदेशीर मार्गाने काम करतो. धर्मादाय आयुक्त आमचे प्रमुख आहेत. त्यांच्या आदेशानुसार आम्ही ‘सीआयडी’च्या ताब्यात संबंधित दागिने दिले आहेत,’ असे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here