भारतीय संघाला आतापर्यंत चांगली सुरुवात मिळू शकलेली नाही. कारण लोकेश राहुल हा गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. तीन सामन्यांमध्ये मिळून त्याला फक्त एकच धाव करता आली आहे. त्याचबरोबर गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे चौथ्या सामन्यात त्याला वगळले तर ते भारतीय संघाच्या पथ्यावर पडू शकते.
भारतीय संघाला या मालिकेत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचा चांगला सामना करता आलेला पाहायला मिळत नाही. कारण इंग्लंडचा मार्क वुड, जोफ्रा आर्चर यांनी भारतीय संघाला एकामागून एक धक्के दिले आहेत. गेल्या सामन्यातही मार्क वुडने भेदक गोलंदाजी करत तीन फलंदाज माघारी धाडले होते. त्यामुळे आता भारताला जर चांगली सुरुवात करायची असेल तर त्यासाठी वेगवान गोलंदाजीचा चांगला सामना त्यांना करावा लागेल.
भारतीय संघामध्ये नवव्या क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजी दिसत आहे. पण त्यांच्याकडून चांगली गोलंदाजी होत असल्याचे पाहायला मिळत नाही. कारण हार्दिक पंड्याचा वापर पाचवा गोलंदाज म्हणून केला जातो. त्यामुळे भारतीय संघाला जर चौथा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी पाच गोलंदाजांसह मैदानात उतरायला हवे. यामध्ये दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश असू शकतो. त्याचबरोबर एखाद्या गोलंदाजाला जर जास्त धावा जात असतील तर त्याची उर्वरीत षटके हार्दिक पंड्या टाकू शकतो.
भारतीय संघाला जर ही मालिका जिंकायची असेल तर त्यांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षण बदलावे लागेल. कारण कर्णधार विराट कोहलीकडूनही झेल सुटले आहेत. त्याचबरोबर भारताच्या खेळाडूंना गचाळ क्षेत्ररक्षण करत बऱ्याच धावा इंग्लंडला आंदण दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाने क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे गरजेचे असेल. भारताने चांगले क्षेत्ररक्षण करत धावा वाचवल्या तर त्यामुळे इंग्लंडच्या संघावर अधिक दडपण बनवता येऊ शकते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times