भायखळा: डाव्या बाजूला पोटदुखीची तक्रार असलेल्या एका तरुणावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या पोटातून गर्भाशय आणि बिजांडे काढण्यात आली. या दुर्मीळ प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर एकोणीस वर्षांचा हा तरुण द्विलिंगी असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जे.जे. रुग्णालयाच्या युरॉलॉजी विभागाचे प्रमुख व त्यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. या तरुणाला मागील दोन वर्षांपासून डाव्या बाजूला पोटदुखीचा त्रास होत होता. अनेक डॉक्टरांना दाखवूनही कोणताही फरक न पडल्यामुळे अखेरीस तो जे. जे. रुग्णालयात दाखल झाला. या रुग्णाच्या पोटात डाव्या बाजूला गाठ असल्यासारखे आढळून आले. या डाव्या बाजूच्या अंडकोषातील अंडाशय उपलब्ध नसून उजव्या बाजूचे अंडाशय व्यवस्थित होते. त्याची वीर्य तपासणी केली असता त्याच्या वीर्यात शुक्राणू सापडले नाहीत. एमआरआयमध्ये या रुग्णाच्या पोटात डाव्या बाजूला बीजांड व त्याभोवती रक्त साकळून गाठ असल्यासारखे दिसले. तसेच त्या रुग्णाच्या पोटात स्त्रियांमध्ये असणारे गर्भाशय, योनी व इतर जननेंद्रियाचे भाग सापडले. जनुकीय चाचणी केली असता त्याच्यामध्ये स्त्रीत्वाचे तसेच पुरुषाचे जनुकीय अंश उपलब्ध होते.
वाचा:
यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. गीते म्हणाले, ‘रुग्ण द्विलिंगी मानव समूहात मोडणारा असून त्याच्या डाव्या बाजूस स्त्रीबीज, गर्भाशय, गर्भनलिका आणि आकुंचित असलेली योनी जी मूत्रनलिकेत उघडत होती. त्यामुळे त्याच्यात मासिक पाळी येऊन या रुग्णास डाव्या बाजूला पोटदुखीचा त्रास होत होता. पण मासिक पाळीत होणारा रक्तस्त्राव हा आंकुचित योनीमुळे बाहेर न पडता, बीजांडाभोवती साचून त्याची गाठ निर्माण झाली होती. तर उजव्या बाजूला अंडाशय आणि वीर्य नलिका, जी योनीमध्ये उघडत होती. जनुकीय संरचनेतील बदलामुळे ही स्थिती निर्माण झाली होती.’
वाचा:
या रुग्णाच्या पालकांना सर्व परिस्थिती समजावून सांगण्यात आली व पुढील आयुष्य स्त्री की पुरुष म्हणून जगायचे, हा निर्णय त्यांना विचारण्यात आला. या रुग्णाची बाह्य शारीरिक व मानसिक वाढ पुरुष म्हणून झालेली असल्यामुळे त्यांनी पुरुष हा पर्याय निवडला. त्यासाठी त्याचे समुपदेशनदेखील करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्याच्या शरीरात असलेले बीजांड, गर्भाशय, योनी हे भाग शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आल्याची माहिती डॉ. गीते यांनी दिली. हा रुग्ण आता भविष्यात टेस्ट ट्यूबच्या सहाय्याने अपत्यप्राप्तीचा आनंदही घेऊ शकेल असे डॉ. गीते यांनी सांगितले. जे. जे. रुग्णालयातली ही दुसरी शस्त्रक्रिया आहे. त्यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनीही सहकार्य केल्याचे डॉ. गीते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times