अमरावतीः आदिवासींच्या हाताला मनरेगातून मुबलक मजूरी मिळत नाही, मजूरी मिळाली तर मग वेळेवर मजुरीचा मोबदला मिळत नाही अश्या नानाविध समस्येतून त्रस्त झालेल्या डाबक्याच्या सहा तरुणांनी रोजगाराच्या शोधात दोन महिन्यांपूर्वी मुंबई गाठली होती. तेथे रोजगार देखील मिळाला. पण नियतीपुढे तरुणांचा संघर्ष हारला असाच काहीसा प्रकार घडला आहे.

नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या सहा तरुणांपैकी एका तरुणाचा मुंबई येथे मृत्यू झाल्याची अधिकृत माहीती ढाबका येथे गावकऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आल्यामूळे मेळघाटात एकच शोककळा पसरलेली दिसून आली. मृतक तरुणाचे नाव सुरज शिवराम धांडे ( २० ) रा. ढाबका सांगण्यात आले असून तो मुंबई येथील एका खाजगी मालवाहू कंपनीकडे हमाली काम करीत होता. सोमवारच्या रात्री हमाली आटपून जेवण केल्यानंतर सुरज झोपला. पण मंगळवारच्या सकाळी तो त्याच्या ईतर साथीदारांना बिछान्यावर मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसून उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह मुंबई येथून मेळघाटातल्या त्याच्या गावी ढाबका येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सुरजचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण पूढे येणार असून मुंबई येथून मेळघाटापर्यंत मृतदेह आणण्यासाठी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते वहीद पठाण यांनी धारणी पोलीसापर्यंत ही माहीती पूरवून पूढील तपास करण्यात यावी अशी मागणी मृतक कुंटुबीयांच्या वतीने केली आहे.

मागेल त्या हाताला काम अशी घोषणा करणारे राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले असून आदिवासीबहुल भागात मनरेगा मार्फत आदिवासीच्या हाताला काम मिळत नाही, काम मिळाले तर वेळेवर मोबदला अदा करण्यात येत नाही. त्यामुळे मेळघाटातील मजूरवर्ग हा राहत्या गावातून महानगरांकडे स्थलांतरित होतो.
पोटाची खळगी मिटविण्यासाठी आजघडीत मेळघाटातून तब्बल १०, ००० मजूर परप्रांतात स्थलांतरित असून गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश सारख्या ईतर राज्यातील बड्या महानगरांमध्ये सहकुटुंब वास्तव्यास असून तेथे जोखमीच्या कामांवर घाम गाळून पोट भरत आहेत. यापूर्वीही अश्याच अनेक दुर्घटना घडल्या असून अनेकांचे जीव अपघाती घटनेत गेले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here